का बुडाले केरळ? (भाग-३)

प्रा. डॉ. मधुकर बाचुळकर, ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ

डॉ. माधव गाडगीळ समितीने 2011 मध्ये दिलेला इशारा खरा ठरल्याचे केरळमधील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या हाहाकारातून दिसत आहे. अतिवृष्टी नैसर्गिक होती, पण नुकसान हे मानवी हस्तक्षेपामुळे अतिप्रमाणात झाले. तिथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. याचे कारण जंगलांचा केलेला विनाश. त्यातूनच भूस्खलन झाले आणि चिखलनिर्मिती झाली. केरळसारखी स्थिती गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यातही भविष्यात उद्‌भवू शकते. त्यामुळे केरळच्या प्रकरणातून राज्यकर्ते, शासकीय अधिकाऱ्यांनी धडा घेतला पाहिजे. निसर्ग, पर्यावरण, जंगले अबाधित राखण्याचे प्रयत्न केले पाहिजे.

ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी म्हटलेच आहे की, पश्‍चिम घाटाविषयी दिलेल्या अहवाल आणि सूचनांचे वेळीच पालन केले असते तर ही वेळच आली नसती. अतिवृष्टी झाली असती. मात्र, नुकसान एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेच नसते. गाडगीळ समितीचा अहवाल 2011 मध्ये सादर झाला. दुर्दैवाने, कोणत्याही सरकारने तो स्वीकारला नाही. केरळमधील जंगलतोड, वृक्षतोड, जंगल, नद्या यांच्यावरील अतिक्रमणे, नद्यांमधून बेसुमार अतिवृष्टी आणि भातशेतीवरील अतिक्रमण, बेफाट बांधकाम यामुळे महापूर येण्याचा धोका वाढला आहे हे गाडगीळ समितीने आधीच सांगितले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत स्तरावर या अहवालाची ताबडतोब अंमलबजावणी करावी असेही अहवालात म्हटले होते. मात्र तो अहवालच स्वीकारला नसल्याने त्यातील सूचना, उपाय याची अंमलबजावणी कोणत्याही सरकारने केली नाही.
2011 मध्ये अहवाल सोपवल्यानंतरही हा अहवाल प्रसिद्ध केला नव्हता. तो अहवाल प्रसिद्ध व्हावा यासाठी काही बिगरशासकीय संस्थांनी न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने तत्काळ अहवाल प्रसिद्ध कऱण्यास सांगितले. पण तो
इंग्रजीमध्ये होता. मग तो अहवाल स्थानिकांसाठी स्थानिक भाषेत असावा अशी सूचना करण्यात आली. पण तरीही कार्यवाही सरकारने केली नाही. त्यामुळे या विषयावर काम करणाऱ्या बिगरशासकीय संस्था दिल्ली उच्च न्यायालयात गेल्या.

शेवटी दिल्ली उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर माहिती आयुक्तांनी अहवाल प्रसिद्ध केला. पण जो अहवाल प्रसिद्ध झाला तो त्रोटक होता आणि त्यात त्रुटी होत्या. त्यातील सूचना आणि माहितीचा विपर्यास सर्वच राज्यांनी केला. भाषांतरित अहवालात त्यातील खऱ्या माहितीचा विपर्यास केला गेला. त्यामुळे अहवालाबाबत गैरसमजच झाला. हा प्रकार केरळातच झाला असे नाही; महाराष्ट्रात शासकीय अधिकाऱ्यांनी, राजकीय नेत्यांनी गावांमध्ये अहवालाची चुकीची माहिती दिली गेली.

राजकीय नेत्यांना केवळ मते मिळवायची आहे. त्यांना पर्यावरणाचे संवर्धन, जतन करण्याची गरज नाही. म्हणूनच लोकांना भडकवून आंदोलने पेटले. सहाही राज्यांत या अहवालाविरोधात आंदोलने, विरोध झाला. या अहवालात अत्यंत कडक नियम आहेत आणि ते सर्वच नियम पाळले तर विकासाला खीळच बसेल या सबबीखाली हा अहवालच
फेटाळला. त्यानंतर रान मोकळेच झाले.

आज केरळच नव्हे तर इतरही राज्यात बेकायदेशीर प्रकल्प वेगाने राबवले जाताहेत. विशेषतः, गेल्या पाच सहा वर्षांत खूप वेगाने प्रकल्प राबवले गेले. त्यातून पर्यावरणाची हानी झाली. वस्तूतः, लोकसहभागातून डॉ. माधव गाडगीळ अहवालाची अंमलबजावणी होण्याची गरज होती पण ते झाले नाही. आजही पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्यांचे मत हेच आहे की हा अहवाल स्वीकारला असता आणि त्याप्रमाणे सर्व गोष्टी अंमलात आणल्या असत्या किंवा योग्य कार्यवाही केली असतील तर केरळात जी मानवनिर्मित आपत्ती आली त्याचे प्रमाण एवढे भीषण नक्कीच नसते. ही आपत्ती निर्माण होण्याचे कारण म्हणजे कमी वेळात झालेली अतिवृष्टी. पण मोठ्या प्रमाणातील नुकसान हे मानवनिर्मित होते.

थोडक्‍यात, अतिवृष्टी नैसर्गिक होती पण नुकसान हे मानवी हस्तक्षेपामुळे अतिप्रमाणात झाले. तिथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. याचे कारण जंगलांचा केलेला विनाश. त्यातूनच भूस्खलन झाले आणि चिखलनिर्मिती झाली. केरळमध्ये कॉफी, चहा, रबर या शेतीसाठी जंगल उद्‌ध्वस्त करण्यात आली. केरळमध्ये आज ही आपत्ती आली ती मानवी हस्तक्षेपामुळे. तोच प्रकार पश्‍चिम घाटातील बाकीच्या राज्यात होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे केरळनंतर गोव्यात अशी आपत्ती येण्याची शक्‍यता आहे. कारण गोव्यामध्ये प्रचंड मोठे खाणकाम करून जंगल नष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यातही अशीच स्थिती आहे. त्यामुळे केरळच्या प्रकरणातून राज्यकर्ते, शासकीय अधिकाऱ्यांनी धडा घेतला पाहिजे. निसर्ग, पर्यावरण, जंगले अबाधित राखण्याचे प्रयत्न केले पाहिजे.

#मेन स्टोरी: का बुडाले केरळ? (भाग-१)

#मेन स्टोरी: का बुडाले केरळ? (भाग-२)

#मेन स्टोरी: का बुडाले केरळ? (भाग-३)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)