श्रीगोंदा: काहींनी पक्ष सोडला आणि दक्षिणेत कॉंग्रेस संपली, असे सांगण्यात आले. मी हे पाहण्यासाठी आलो. पण कॉंग्रेस संपला नाही, तर डबल वेगाने वाढला, असा टोला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विखे यांना लगावला.
श्रीगोंदा येथे कॉंग्रेस कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत थोरात बोलत होते.
आ. थोरात म्हणाले, मला खासदार व्हायचे, असा बाल हट्ट धरला. तुम्हाला गल्ली पासून दिल्ली पर्यंतची सत्ता दिली. पण उमेदवारी दिली नाही. पक्षाला धोका दिला. हा बालहट्ट यंत्रणा घेऊन आले आहेत. या यंत्रणेला प्रवरा कारखान्यातील कामगारांचे पगार झाले का? उसाचे बिल दिले का? असे विचारा. चुकून ते खासदार झाले, तर प्रत्येक गावात तीन पॅनेल होतील. जिरवा जिरवीचे राजकारण सुरू होईल, हे तुम्हाला परवडणार नाही.
राजेंद्र नागवडे म्हणाले, अनुराधा नागवडे यांना राष्ट्रवादीची उमेदवार मिळणार, असे दिसताच विखे यांनी भाजपत उडी मारली आणि उमेदवारी घेतली. सर्व सत्ता यांना घरात पाहिजे असते. दुसऱ्याला काही दिले की अन्याय झाला. पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसऱ्यांना आता मतदार घरचा रस्ता दाखविणार, हे निश्चित आहे. अनुराधा नागवडे म्हणाल्या, मी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी इच्छुक होते. तडजोडीच्या राजकारणात मीच आ. संग्राम जगताप यांना उमेदवारी द्यावी, असे सांगितले.
प्रास्ताविक ऍड. अशोकराव रोडे यांनी केले. यावेळी आ. संग्राम जगताप, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष करण ससाणे, ज्ञानदेव वाफारे, मनोहर पोटे, दादासाहेब मुंडे, प्रशांत दरेकर, संजय डाके, हृषीकेश भोयटे यांची भाषणे झाली. आ. राहुल जगताप, घनश्याम शेलार, नगराध्यक्षा शुभांगी पोटे, धनसिंग भोयटे, सचिन गुजर, केशव मगर, अर्चना गोरे, अरुणराव पाचपुते, आसिफ इनामदार, समीर बोरा, सुनील जंगले, नितीन वाबळे, मधुकर शेलार उपस्थित होते. आभार ऍड. सुनील भोस यांनी मानले.