काश्‍मीरचा मुद्दा चर्चेनेच सोडवायला हवा- इम्रान खान

इस्लामाबाद – काश्‍मीर हा अंतर्गत मुद्दा आहे. त्यावर चर्चेतूनच तोडगा काढला जायला हवा, असे प्रतिपादन पाकिस्तानच्या निवडणूकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या “पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ’ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांनी केले आहे. निवडणूकीचा अंतिम निकाल येण्यापूर्वीच “पीटीआय’ पक्षाचा विजय निश्‍चित झाल्यावर इम्रान खान यांनी वृत्तवाहिनीवरून देशाला उद्देशून भाषण केले. या भाषणामध्ये इम्रान खान यांनी काश्‍मीर, भारताबरोबरचे संबंध, व्यापारी संबंध आदी विषयांवर भाष्य केले.

काश्‍मीर हा भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा अंतर्गत मुद्दा आहे. गेल्या 30 वर्षात भारतीय लष्कराकडून मोठ्या प्रमाणावर मानवी हक्कांचे उल्लंघन झाले आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी एकत्र येऊन चर्चेद्वारे या समस्येवर तोडगा शोधला पाहिजे. काश्‍मीर हा भारत आणि पाकिस्तानमधील भांडणाचा सर्वात मोठा मुद्दा आहे. दोन्ही देशांनी आता एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणे थांबवून चर्चेसाठी एकत्र यायला हवे. अन्यथा या मुद्दयावर तोडगा काढला जाऊ शकणार नाही, असे इम्रान खान म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारताच्या नेतृत्वाने परवानगी दिल्यास संबंध सुधारण्यास मी इच्छुक आहे. सध्या हे संबंध एकतर्फीच आहेत. हिंसाचाराला पाकिस्तानलाच जबाबदार धरले जाते. जर चर्चेसाठी भारत एक पाऊल पुढे टाकत असेल, तर पाकिस्तान दोन पावले पुढे यायला तयार असेल. दोन्ही देशांमधील संबंध सुधारणे हे उपखंडाच्याही फायद्याचे आहे, असा आशावाद इम्रान खान यांनी व्यक्‍त केला. भारताबरोबरच्या व्यापारी संबंधांमध्येही सुधारणा करण्याचे सूतोवाच इम्रान खान यांनी केले आहे. हे व्यापारी संबंध केवळ या दोन देशांच्या फायद्यांसाठीच असता कामा नयेत, तर दक्षिण आशियाच्या फायद्यासाठी असले पाहिजेत. आम्हाला दारिद्रय विरहीत उपखंडाची अपेक्षा आहे. उपखंडातील व्यापारी संबंध सुधारणे हे पाकिस्तानच्या हिताचेच असेल.

भारतीय मिडीयाने खलनायक ठरवले
निवडणूकीच्या प्रचारादरम्यान भारतीय प्रसार माध्यमांकडून आपले वार्तांकन ज्या प्रकारे केले गेले त्यामुळे आपण दुःखी झालो. बॉलिवूडमधील खलनायकाप्रमाणे आपली प्रतिमा रंगवण्यात आली होती. क्रिकेटच्या निमित्ताने मी भारतभर हिंडलो आहे. भारताबरोबर चांगले संबंध ज्या पाकिस्तानी नागरिकांना हवे आहेत, त्यांच्यापैकीच आपणही एकजण आहोत, असे इम्रान खान म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)