कालव्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू

भगदडामागे केबल खोदाईचे कारण : तळापासूनच जमीन भुसभुशीत झाल्याचा दावा

पुणे : खडकवासला कालवा दुघर्टनेनंतर जलसंपदा विभागाकडून गुरुवारी सायंकाळीच या कालव्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी आवश्‍यक असलेले साहित्य या ठिकाणी आणण्यात आले असले तरी, या कालव्याला भगदड नेमके कशामुळे पडले यावरून आता चर्चांना सुरुवात झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या ठिकाणी गळती असल्याचे पत्र दिल्याचा दावा या भागातील भाजप तसेच राष्ट्रवादीच्या स्थानिक नगरसेवकांनी केला असला तरी, ही गळतीची पत्र आज दुर्घटना झाली त्या ठिकाणची नव्हे तर निलायम टॉकीज जवळील आहेत. त्यामुळे या गळतीबाबत केवळ स्थानिक नागरिकच तक्रारी करत असल्याचे समोर आले. ज्या ठिकाणी गळती झाली, त्या ठिकाणी तळापासूनच जमीन भुसभुशीत झाल्याचा दावा घटनास्थळी उपस्थित असलेल्या जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला असला तरी, प्रत्यक्षात कालव्याच्या भींतीत खासगी मोबाईल कंपन्यांच्या चार ते पाच केबल आणि महावितरणच्या केबलही भींत खोदून टाकण्यात आल्याचे प्रत्यक्ष घटनास्थळी दिसत आहे. त्यामुळे या दुघर्टनेमागे नेमके कारण कोणते याबाबत आता चर्चांना सुरुवात झाली आहे.

प्रत्यक्षदर्शिंनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी पाण्याची गळती कमी प्रमाणात होती. मात्र, नंतर या ठिकाणी कालव्याची भिंतच खोदून मोबाईल कंपन्याचे केबल टाकल्या जात असल्याचे चित्र होते. ही माहिती नागरिकांनी स्थानिक अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनाही दिली. मात्र, त्यांच्याकडून काहीच हालचाल करण्यात आली नसल्याचे नागरिक सांगतात, या ठिकाणी कंपन्याना खालील बाजूने केबल टाकणे अडचणीचे होते, खोदाईसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागला असता, त्यामुळे कंपन्यांनी काही लोकप्रतिनिधींना हाताशी धरून कॅनॉलच्या भुसभुशीत जमिनीची निवड केबल टाकण्यासाठी केली. ही केबल वाहत्या पाण्याच्या प्रवाहापासून अवघ्या 4 ते 5 फूट अंतरावर आहे. त्यावरून हे स्पष्ट लक्षात येते की कालव्याची भिंत केबलसाठी खोदण्यात आली होती. जर कालव्याच्या खालील बाजूस मोठी गळती असेल, तर वरील कामाने त्या ठिकाणची जमीन आणखी भुसभुशीत होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यातच पालिकेकडूनही त्या भागात काही महिन्यांपूर्वी काम करण्यात आले असून महावितरणच्या केबलही त्याच बाजूला टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे कालव्याची भींत खोदई केल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

गळती पूर्वीपासून, निविदाही काढल्या
दुर्घटनेनंतर जलसंपदा विभागाचे काही अधिकारी घटनास्थळी थांबून होते. त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी ही गळती मोठ्या प्रमाणात असल्याचे पुर्वीच निर्दशनास आले होते. त्यासाठी मागील वर्षी निविदाही काढण्यात आल्या होत्या. मात्र शासनाकडून जलसंपदा विभागाच्या काही निविदा रद्द करण्यात आल्या त्यात या कामाचीही निविदा असल्याचेही स्पष्ट केले. मात्र, आपले नाव छापण्यास या अधिकाऱ्याने विरोध केला. त्यामुळे या गळतीची पूर्वकल्पना जलसंपदा विभाग तसेच कालव्यावर केबल टाकण्यासाठी करण्यात आलेल्या खोदाईची माहिती प्रशासनाला या पुर्वीच होती. मात्र, केवळ कालवा दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने तब्बल 700 हून अधिक संसार उध्द्वस्त झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)