कालवा “भुयारी’ होणे गरजेचे

गिरीश महाजन : पाण्याचा अपव्यय टळून अडीच टीएमसी पाणी वाचणार

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि.28 – मुठा कालवा आणि आसपासच्या परिसरात झालेले अतिक्रमण… खुल्या कालव्यामुळे पाण्याचा होणारा अपव्यय… कालव्याची झालेली दुरवस्था… तसेच अशाप्रकारच्या घटना पुन्हा घडू नये यासाठी हा कालवा “भुयारी’ करण्याचा ठराव नियामक मंडळामध्ये करण्यात आला आहे. यामुळे पाण्याचा अपव्यय टळणार असून, अडीच टीएमसी पाणी वाचणार आहे. प्रदूषणही होणार नाही. त्यामुळे हा कालवा भुयारी होणे खरी गरज असल्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुठा कालव्याला भगदाड पडल्यामुळे घडलेल्या दुर्घटनेची गिरीश महाजन यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जावून पाहाणी केली. त्यावेळी कालव्याची अवस्था पाहाता, जुना असल्यामुळे अनेक ठिकाणी जमीन खचलेली आहे. भविष्यात दुर्घटना घडू नये यासाठी दुरुस्ती होणे आवश्‍यक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावेळी महाजन यांनी महापालिकेने पाण्याची पर्यायी व्यवस्था केली असेल तर त्वरीत कामाला सुरवात करण्यात येईल. कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडण्यात येते, ते बारा महिने नसते. त्यामुळे तुम्ही म्हणाल त्यावेळी दुरुस्तीच्या कामाला सुरवात करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या कालव्यातून लष्कर भागाला पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे कालवा बंद ठेवू शकत नाही. सध्या लष्करसाठी नवीन पाईपलाईनचे काम सुरू असून, सहा किलोमिटरचे काम पूर्ण झाले असून, तीनशे मीटरचे काम राहिले आहे. येत्या दीड महिन्यात ते पूर्ण होईल, असे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींकडून सांगण्यात आले. त्यामुळे हे काम पूर्ण झाल्यावर कालवा बंद ठेवून सर्व दुरुस्तीची कामे करण्यात येईल, असेही ते म्हणाले. तसेच कालव्यावरील अतिक्रमणाचा प्रश्‍न गंभीर असून, एकीकडे अतिक्रमणे काढूनही पुन्हा होत आहे; तर दुसरीकडे कालव्यातून पाणी सोडावेच लागणार आहे. त्यामुळे अशा घटनांमध्ये पुन्हा जबाबदारी कोणाची असा प्रश्‍न उपस्थित होतो. त्यामुळे कालव्यावर पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, अशी सूचना महाजन यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

————————-
एलएनटीसह काही कंपन्यांचे इस्टीमेट
मागील आठ महिन्यांपूर्वी नियामक मंडळाने मुठा कालवा भुयारी करण्याला मंजुरी दिली. त्यानुसार कालवा बांधण्यासाठी किती खर्च येईल याबाबत ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून कंपन्यांकडून इस्टीमेट मागवण्यात आले आहे. त्यानुसार एलएनटी, गॅम्बलर यासरख्या दहा ते बारा कंपन्या पुढे आल्या असून, बाराशे ते तीन हजार कोटीपर्यंतचे इस्टीमेट आले आहे. परंतु, हा कालवा बाराशे ते तेराशे कोटीमध्ये होणे अपेक्षीत आहे. भुयारी कालव्यामुळे 35 किलोमिटरचा कालवा 24 किलोमिटर होणार आहे. अडीच टीएमसी पाणी वाचणार असून, प्रदूषणही होणार नाही. तसेच कालवा फुटाफुटी, जीवीतहानी यासारख्या घटना घडणार नाही. त्यामुळे लवकरच हा प्रश्‍न मार्गी लावण्यात येईल, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)