कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर!

  • अजित पवार : सत्ताधारी भाजपवर घणाघात

पिंपरी – गुजरातमध्ये घोड्यावर का फिरतो? म्हणून एका मागासवर्गीय मुलाला मारहाण करण्यात आली. त्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. खुद्द पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या गुजरातमध्ये कायद्याचे धिंदवडे काढले जात आहेत. हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा अवमान आहे. पिंपरीतील आत्महत्तेच्या घटनेत भाजपची नगरसेविका आणि तिच्या पतीचे नाव असल्याची चिट्टी पोलिसांना मिळाली आहे. त्यातील संबंधितांवर तातडीने कारवाई का केली जात नाही? असा प्रश्न माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.

भोसरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पवार बोलत होते. यावेळी माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी महापौर योगेश बहल, मोहिनी लांडे, वैशाली घोडेकर, भाऊसाहेब भोईर, वसंत लोढे, अजित गव्हाणे, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, युवती शहराध्यक्षा वर्षा जगताप, फजल शेख आदी यावेळी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पवार म्हणाले की, देशात भाजप आणि शिवसेनेचं जातीयवादी सरकार आहे. त्यामुळे देशासह राज्यभरात गुन्हेगारी वाढली आहे. अल्पसंख्याक समाज भयभीत झाला आहे. गुजरातमध्ये गुन्हेगारी वाढली आहे. घाईघाईत शपथविधी उरकणा-या येडियुरप्पांना कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा राजीमाना द्यावा लागला. राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रगीत होताना भाजपचे नेते सभागृहात थांबले सुध्दा नाहीत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी रामनाथ कोविंद हे देखील राष्ट्रगीत सुरू असताना एका व्यासपीठावर स्थानापन्न होतानाची क्‍लीप व्हायरल झाली आहे. देशाच्या राष्ट्रपतीने असे करणे म्हणजे बाबासाहेबांच्या घटनेचा अवमान केल्यासारखेच आहे, अशी टीका पवार यांनी केली.

व्यवसायिकांचे आर्थिक कंबरडे मोडले…
तत्कालीन मंत्र्यांनी परदेशातील बॅंकेत ठेवलेला काळा पैसा देशात आणून प्रत्येक नागरिकांच्या बॅंक खात्यात पंधरा लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन मोदींनी दिले होते. केंद्र सरकारला चार वर्ष पूर्ण झाली. अद्याप एक रुपया सुध्दा मोदींनी परदेशातून काळा पैसा भारतात आणला नाही. काळा पैसा नक्षलवाद्यांच्या उपयोगाकरिता वापरला जात असल्याचे सांगून नोटबंदीचा निर्णय घेतला. तोही फसला. कारण, तत्कालीन सरकारच्या कार्यकाळात 500 रुपयांच्या 15 लाख नोटा व्यवहारात होत्या. नोटबंदीनंतर पाचशेच्या 17 लाख नोटा व्यवहारात आल्या आहेत. तरीही, आज सर्वसामान्य नागरिकाला “एटीएम’मधून पैसे मिळत नाहीत. एवढे पैसे नेमके काढले कोणी? याचे उत्तर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी द्यावे. दररोज पेट्रोल, डिजेलचे भाव वाढत आहेत. त्यामुळे टॅंकरची टाकी फुल करण्यासाठी पाच हजार रुपये अधिकचे द्यावे लागत आहेत. त्यामुळे व्यवसायिकांचे कंबरडे मोडले आहे, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)