कामावरून काढल्याच्या रागातून केले होते अपहरण

48 तासाच आरोपी अटकेत, गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई

पिंपरी – चोरीचा खोटा आरोप ठेऊन कामावरून काढल्याच्या रागातून कंपनी कामगारांनीच कंपनी संचालकाचे अपहरण करून मारहाण केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. गुन्हे शाखा युनिट एकच्या तपासी पथकाने अपहरण करणाऱ्या आरोपींना 48 तासाच्या आत अटक केले आहे.

योगेश गणपती काकडे (वय-25 रा. चऱ्होली, खेड) किरण राजेंद्र सकटे (वय-22 रा. आळंदी) अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत. या दोघांनी “राठी पॉलीबॉंन्ड’ या कंपनीचे उपसंचालक डॉ. शिवाजी पडवळ यांचे अपहरण करून त्यांना मारहाण करुन चौफुला येथे सोडले होते.

युनिट एकचे वरिष्ट पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे आळंदी येथील “राठी पॉलीबॉंन्ड’ कंपनीत कामगार म्हणून कामाला होते. मध्यंतरी या दोघांनीही कंपनीत होत असलेल्या चोरीबद्दल मालकाला व डॉ.पडवळ यांना माहिती दिली. मात्र पडवळ यांनी कारवाई करण्याऐवजी आरोपच खोटे ठरवले काकडे व सकटे यांच्यावरच आळ आणला व त्यांना कामावरून काढून टाकले. याचा राग दोघांच्याही मनात असल्याने त्यांनी डोळ्यात मिरचीपूड टाकत पडवळ यांचे अपहरण करत मारहाण केली, अशा प्रकारे आरोपींनी गुन्ह्याची कबूली दिली आहे. आश्‍चर्याची बाब म्हणजे ही सारी माहिती असताना देखील डॉ. पडवळ यांनी कोणतीच माहिती पोलिसांना दिलेली नव्हती. याबाबतची माहिती नसतानाही तपासी पथके तपास करत होती. दरम्यान पोलीस शिपाई गणेश सावंत यांना माहिती मिळाली की, आरोपी हे मुंबईवरून पुण्याकडे रेल्वेने येणार आहेत. त्यानुसार शिवाजीनगर रेल्वे स्थानकावर सापळा रचून रेल्वे स्थानकावरून दोघांनाही पोलिसांनी अटक केले.

ही कारवाई गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्‍त सतीश पाटील, गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी महेंद्र तातळे, सचिन उगले, प्रमोद हिरळकार, गणेश सावंत, प्रवीण पाटील, विशाल भोईर, अरुण गर्जे यांनी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.