कान्हे-नायगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, माजी सरपंच “एसीबी’च्या जाळ्यात

  • विद्युत साहित्य पुरविल्याचे बिल मंजुरीसाठी मागितली लाच

वडगाव मावळ – ग्रुप ग्रामपंचायत कान्हे-नायगाव कार्यालयाला विद्युत वस्तू पुरवल्याचे बिले देण्यासाठी 7 हजार 500 रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ग्रामसेवक व महिला माजी सरपंच यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पथकाने शुक्रवारी (दि. 17) कारवाई केली.

ग्रामसेवक आनंदकुमार काशिनाथ होळकर (वय 41, रा. वरसुली, ता. मावळ अतिरिक्‍त कार्यभार कान्हे-नायगाव ग्रुप ग्रामपंचायत) व महिला माजी सरपंच पूनम राजेंद्र सातकर (वय 37, रा. आमदार पडाळ, कान्हे, ता. मावळ) असे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पथकाने कारवाई केलेल्या आरोपींची नावे आहेत.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी ग्रुप ग्रामपंचायत कान्हे-नायगाव कार्यालयाला विद्युत वस्तू पुरविल्या होत्या. त्या वस्तूंची बिले देण्यासाठी आरोपी ग्रामसेवक आनंदकुमार होळकर व महिला माजी सरपंच पूनम सातकर यांनी तक्रारदार यांना 7 हजार 500 रुपयांची मागणी केली.

तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयात तक्रार दिली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने सापळा रचला. महिला माजी सरपंच पूनम सातकर यांनी लाचेची रक्कम स्वीकारल्याने पथकाने रंगेहात पकडले. आरोपींवर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची चर्चा परिसरात रंगली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.