कात्रज येथे इस्टेट एजंटचा डोक्‍यात वार करुन खून

पुणे,दि.20 कात्रज येथील सच्चाई माता डोंगरावरील एका फार्म हाऊसमध्ये इस्टेट एजंटचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली तेव्हा त्याच्यावर कोयत्यासारख्या हत्याराने डोक्‍यात व खांद्यावर वार करून खून करण्यात आल्याचे आढळले.

अजय जयस्वाल ( 42 रा. मुळ उत्तर प्रदेश, सध्या कोथरुड) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकऱणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय जयस्वाला हा इस्टेट एजंट होता. त्याला त्याचा कर्मचारी शनिवारी फार्म हाऊसवर शेवटचा भेटला होता. मात्र कालपासून त्याचा फोन जयस्वाल उचलत नव्हता. त्यामुळे त्याने जयस्वालचा शोध घेण्यास सुरुवात केली. जयस्वाल याचे सच्चाई माता डोंगर परिसरात एक छोटे फार्म हाऊस आहे. तो आधूनमधून येथे येत असतो. दरम्यान त्याच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने या घरी येऊन पाहणी केल्यावर दाराला कुलुप होते, मात्र त्याची गाडी बाहेर उभी होती. यामुळे त्याने खिडकी उघडत आत डोकावले तेव्हा जयस्वाल रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यानंतर याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे.
जयस्वाल हा घटस्फोटीत असून तो कोथरुड येथे एकटाच रहातो. पैशाच्या किंवा जमिनीच्या व्यवहारातून खून झाल्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तवली आहे. आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.