काटवलीच्या ग्रामस्थांकडून जखमी मोराला जीवदान

पाचगणी, (प्रतिनिधी) – काटवली (ता. जावळी) येथील ग्रामस्थांनी जखमी मोराला औषधोपचार करून जीवदान दिले. ग्रामस्थांनी वन्य प्राण्यांबाबत दाखवलेले औदार्य व आपुलकी पाहून परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.
काटवली येथील दीपक बाबुराव बेलोशे यांच्या शेतात एक जखमी मोर पडला असल्याची माहिती काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आली. नागरिकांनी ही माहिती माजी सरपंच व तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर बेलोशे व पत्रकार रविकांत बेलोशे याना दिली. बेलोशे यांनी जावळी व महाबळेश्वर वनविभागाशी संपर्क साधून अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. तोपर्यंत सरपंच हणमंत बेलोशे, ग्रामसेवक धनराज वट्टे, मधुकर बेलोशे, पोलीस पाटील विक्रम पोरे, तेजस बेलोशे, अभिषेक बेलोशे, ओंकार बेलोशे, सुशांत बेलोशे, ओंकार पोरे हे युवक व ग्रामस्थांनी या जखमी मोराला शेतातून उचलून काटवलीतील पशुसंवर्धन दवाखान्यात उपचारासाठी आणले या ठिकाणी सुट्टी असल्याने डॉक्‍टर उपलब्ध नसल्याने करहर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गोळे याना बोलावले. डॉक्‍टरांनी मोराला तपासले असता पायाचे वरच्या बाजूला खोल मोठी जखम झाल्याचे दिसून आले. डॉक्‍टरांनी या मोरावर प्राथमिक उपचार केले. परंतु त्याला अधिक उपचारासाठी मेढा येथे न्यावे लागणार असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. तोपर्यंत हुमगावचे वनरक्षक आर. ए. परधाने व मेंढ्याचे वनपाल रज्जाक सय्यद हे या ठिकाणी दाखल झाले.
ग्रामस्थानी सर्व माहिती दिल्यावर हा जखमी मोर वनअधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आला. जावळीचे वनक्षेत्रपाल डोंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोरावर अधिक उपचार करणार असल्याचे वनअधिकाऱ्यानी सांगितले. ग्रामस्थांच्या या तात्परतेबद्दल व वन्य प्राण्यांच्या काळजीवाहू भावनेबद्दल अधिकाऱ्यांनी कौतुक केले. काटवली व परिसरात मोर व लांडोराच्या संख्येत अलिकडच्या काळात वाढ झाली असून त्यांचा शेतीला उपद्रवही वाढला आहे, असे असले तरी माणुसकीच्या भावनेने या जखमी मोराला ग्रामस्थानी जीवदान देण्याचा केलेला प्रयत्न इतरांना प्रेरणादायी असल्याचे बोलले जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)