कांद्यावरील निर्यात बंदी तात्काळ हटवण्याची मागणी

कराड – निसर्गनिर्मित तर कधी मानव निर्मित संकटांमुळे शेतकऱ्यांची ससेहोलपट सुरू आहे. केंद्र सरकारने कांदा जिवनावश्‍यक वस्तू कायद्यामधून कायमच्या काढून टाकावा. शेतकऱ्याला आपल्या परीने कांद्याची विक्री करता यावी याकरिता केंद्र सरकारने तातडीने कांद्यावरील निर्यात बंदी हटवा, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेने केली आहे. 

यावेळी जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, जिल्हा उपाध्यक्ष सुनील कोळी, युवा जिल्हाध्यक्ष विश्वास जाधव, कराड उत्तर युवा अध्यक्ष रघुनाथ माने, प्रकाश पाटील, पोपट जाधव व शेतकरी उपस्थित होते.

प्रांताधिकारी दिघे यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, एकिकडे केंद्र सरकार शेतकऱ्यांना उत्पन्न दुप्पट घेण्याचे आवाहन करत आहे. परंतू त्याला हमीभाव भेटत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडत आहे. केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लावली आहे. त्यामुळे साधारण एक हजार रुपये कांद्याचे दर ढासळले आहेत.

आणखी कांद्याचे दर खाली येणार असल्याचा अंदाज व्यक्‍त होत आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी व केंद्र सरकारविषयी संतापाची लाट उसळली आहे. तरी केंद्र सरकारने तात्काळ कांद्यावर लावलेली निर्यात बंदी उठवावी, अन्यथा सरकारला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.