कांद्याने केला यंदाही वांदा

पूर्व हवेलीत काढणीची कामे पूर्ण; भाव पडल्याने साठवणुकीवर भर

उरुळी कांचन- हवेली तालुक्‍याच्या पूर्व भागात सोरतापवाडी, तरडे, शिंदवणे, वळती, कोरेगाव मुळ, आळंदी म्हातोबाची, कुंजीरवाडी डाळींब, नायगाव, पेठ, उरुळी कांचन आदी गावांमध्ये कांदा लागवड होते. या पिकासाठी शेतकऱ्यांनी बॅंकांची कर्जे तसेच विविध पतसंस्थेची कर्ज काढून मोठ्या प्रमाणात आर्थिक भांडवल वापरले. एकरी 40 ते 50 हजार रूपये खर्च केला. पण, सध्या भाव पडल्यामुळे कांदा विक्रीतून शेतकऱ्यांना एकरी 20 ते 25 हजार रूपये मिळत आहेत. यामुळे कांदा केला यंदाही वांदा, असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

कांद्याचे भाव पडल्याने शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवण्यासाठी कांदा बराकी (चाळी) तयार केल्या आहेत. काढून ठेवलेला कांदा ओला असल्याने त्यावर कांद्याची पात ठेऊन दहा ते बारा दिवस शेतात मुरवला जातो, त्यानंतर बराकीमध्ये कांदा साठवण्यासाठी ठेवला जातो.

बाजारभाव समाधानकारक भाव मिळू लागताच बराकीमधील कांदा विक्रीसाठी पुणे, मंबई अशा मोठ्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविला जातो. सध्या, अनेक गावांमध्ये कांदा पिकांची काढणी सुरू असून कांदा काढणीसाठी मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. त्यातच वाढत्या गरमाईमुळे अवकाळी पावसाची चिन्हे असल्याने शेतकऱ्यांची धावपळ वाढली आहे. रात्री उशिरापर्यंत मुलाबाळांसह शेतकरी कांदा काढणी करीत आहे. सप्टेंबर व ऑक्‍टोंबरमध्ये केलेली कांद्याची काढणी सुरू आहे. कांदा उत्पादनासाठी कांदा बी, रोपे, शेतीची मशागत, सरी काढणे, उजरणी, लागण, खुरपणी, महागडी रासायनिक खते, औषध फवारणी, काढणी, बारदान पिशवी, वाहतूक, हमाली यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करून तसेच तापमानाचा चटका, विजेची समस्या, वातावरणातील अचानक झालेले बदल, मजूरीचे वाढलेले दर, विविध रोगांचा प्रादुर्भाव, पाणीटंचाई यासारख्या विविध समस्यांना तोंड देत शेतकऱ्यांनी कांद्याचे उत्पादन घेतले आहे. मात्र, कांद्याला सध्या प्रतिक्विंटल प्रतवारीनुसार 110 रूपये क्विंटल बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी रडकुंडीला आला आहे. यामुळे कांदा लागवड यावेळी फसली असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

  • दोन वर्षांपासून भाव नाही….
    कांद्याला दोन ते तीन वर्षांपासून चांगला बाजारभाव मिळालेला नाही. यावेळी तरी कांद्याला भाव मिळेल, या आशेने शेतकरी लागवड करतात. मात्र, भाव काही सापडत नाही. यामुळेच यापुढे कांद्याचे उत्पादन घ्यायचे की नाही, असा विचार करीत असल्याचे सोरतापवाडी येथील शेतकरी आप्पासाहेब लोणकर, डाळींब येथील शेतकरी तानाजी म्हस्के, तरडे येथील शेतकरी शंकर पिंगळे, एकनाथ चोरगे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.