रणजित खारतोडे
जवळार्जून- नाझरे कडेपठार परिसरात गेल्या महिनाभरापासून सर्वत्रच कांद्याचा भाव गडगडला आहे. याचा फटका पुरंदर तालुक्याततील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. तर स्थानिक बाजार पेठ, नीरा, बारामती, पुणे, कोल्हापूर, मुंबई आदी बाजारपेठेत कांद्याला किलोला केवळ 6 ते 9 रुपये असा दर मिळतो आहे. मागील सहामाहिच्या तुलनेने हा दर दहापट्टी पेक्षाही कमी आल्याने कांदा कापणी, तोडणी आणि वाहतूक खर्चही शेतकऱ्यांच्या अंगावर पडत आहे. परिणामी कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.
गेल्या 20 वर्षांपासून नाझरे, कडेपठार, जवळार्जून, मावडी कडेपठार, नाझरे सुपे, पांडेश्वर परिसरातील शेतकरी नाझरे जलाशयाच्या पाण्यामुळे शेतीमध्ये शेतकऱ्यांनी कांदा उत्पादनात वेगळी ओळख निर्माण केली आहे. आकाराने मोठा असणाऱ्या गारवा कांद्याला बाजारपेठेत मोठी मागणी आहे. खासकरून हॉटेल व्यवसायासाठी हा कांदा प्राधान्याने वापरला जातो. कमी पाण्यात घसघशीत उत्पन्न देणारे पीक म्हणून कांदा घेण्याकडे स्थानिक शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. दरवर्षी सुमारे 500 ते 600 एकर क्षेत्रात कांद्याची लागवड केली जाते. ऑक्टोनबर महिन्यात लावलेला कांदा फेब्रुवारीपासून काढला जातो. सरासरी 400 टन कांद्याचे उत्पादन दरवर्षी घेतले जाते. तर कांदा साठवण करण्यासाठी कांदा चाळ उपलब्ध नसल्याने अडचण कांदा साठवणीस प्रोत्साहन देण्याही गरज निर्माण झाली आहे मात्र, भाव मिळेल याची शाश्वती नसल्याने बहुतांश शेतकरी कांदा चाळीकडे दुर्लक्ष करीत आहेत.
- कांदा उत्पादनात मोठी वाढ
यंदा झालेल्या चांगल्या पावसामुळे कांद्याचे उत्पादन दरवर्षीच्या तुलनेत वाढले आहे. खासकरून जून ते ऑक्टोदबर या कालावधीत कांद्याला सगळीकडेच आवक कमी असल्याने विक्रमी भाव मिळाला. त्यामुळे आपल्या कांद्यालाही चांगला भाव मिळेल, अशीच शेतकऱ्यांची अपेक्षा होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कांदा लावला. 2200 रुपये किलो या दराने बियाणे खरेदी करून स्वतःच रोपे तयार करून कांद्याची लागवड केली. मार्च पासून कांद्याची काढणी सुरू झाली. सुरुवातीला 30 ते 45 रुपये किलो असा दर होता. त्यानंतर मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून बाजारात आवक वाढल्याने दर कोसळला आहे. - नाईलाजस्तव गाठले मार्केट
नाझरे कडेपठालगतच्या परिसरातील 95 टक्के कांदा मुंबई पुणे, कोल्हापूर, बंगळूरुला पाठविला जातो. त्यासाठी वाहतूक खर्चाची जबाबदारीही शेतकऱ्यांवरच असते. एका टनाला सरासरी 1500 ते 1900 रुपये वाहतूक खर्च आहे. घसरलेल्या दरामुळे वाहतुकीसह काढणीचा खर्चही भागेना झाला आहे. घसरलेल्या दरामुळे शेतकऱ्यांनी गेल्या 15 दिवसांपासून मार्केटला माल पाठविणे बंद केले होते. स्थानिक बाजारपेठेत घरगुती वापरासाठी लागणाऱ्या लहान कांद्याचीच सर्वाधिक मागणी असते. त्यामुळेच परिसरातील मोठ्या कांद्याला स्थानिक ग्राहक कमी आहेत. परंतु गेल्या चार दिवसांत बदललेल्या हवामानामुळे अवकाळी पावसाची चिन्हे असल्याने कांदा खराब होऊ नये म्हणून बळीराजाला पर्यायच नसल्याने नुकसान सहन करीत नाईलाजानेच मार्केट गाठले आहे. - कांदा उत्पादनासाठी एकरी 30 हजार रुपये खर्च येतो. घसरलेल्या दरामुळे वाहतूक खर्च, मजुरी देखील शेतकऱ्यांना परवडणारी नाही. मुळातच मजुरांची टंचाई, बियाण्यांचे वाढलेले दर अशा प्रतिकूल परिस्थितीत घसरलेल्या दराने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून त्यात अवकाळी पाऊसामुळे शेतकरी हैराण झाला आहे.
– नितीन नाझीरकर, कांदा उत्पादक - कांदा निर्यात वाढविली पाहिजे, कांद्यासाठी खते अनुदान द्यावे. कांदाचाळीसाठी 50 टक्के अनुदान सरकारने द्यावे. कृषी खात्याने प्रभावीपणे लक्ष देण्याची गरज. मार्केट कमिटीला साठा करण्यासाठी उद्युक्त करावे.
– संजय गाडेकर, सभापती, कृषी उत्पन्न बाजर समिती, नीरा
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा