काँग्रेसची पिछेहाट सुरूच, भाजपचा वरचष्मा

1999 : तेरावी लोकसभा

– विनायक सरदेसाई

तेराव्या लोकसभेसाठी 1999 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुका या मध्यावधी निवडणुका होत्या. 1998 मध्ये स्थापन झालेले अटलबिहारी वाजपेयी सरकार 13 महिन्यातच अल्पमतात येऊन गडगडले होते. साहजिकच देशात पुन्हा एकदा 13 व्या लोकसभेसाठीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले होते. 40 महिन्यांच्या काळात ही तिसरी लोकसभेची निवडणूक होती. त्याआधी 1998 मध्ये आणि त्याआधी 1996 मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या.

1999 च्यावेळची निवडणूक आणि त्याचा प्रचार अनेक अर्थाने विशेष होता. या पहिल्याच निवडणुका होत्या ज्यामध्ये सोनिया गांधी कॉंग्रेसचे नेतृत्त्व करणार होत्या, पण हाच भाजपसाठी सर्वात मोठा निवडणुकांचा मुद्दा होता. पक्षाने संपूर्ण प्रचारादरम्यान परदेशी सोनिया आणि स्वदेशी अटलबिहारी हाच मुद्दा लावून धरला होता.

या निवडणुकांत सोनिया गांधी दोन जागांवरून निवडणूक लढवत होत्या. उत्तर प्रदेशातील अमेठी आणि कर्नाटकातील बेल्लारीमधून. सोनियांची ही पहिली निवडणूक होती. भाजपने बेल्लारीमधून सुषमा स्वराज यांना सोनियांविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरवले. तिथे प्रचारात “देशाची मुलगी’ विरोधात “परदेशी सून’ असा प्रचाराचा रोख होता. पण सोनिया जिंकल्या. अर्थात एकूण देशभरात कॉंग्रेसच्या जागा 141 हून कमी होत 114 झाल्या. तसेच परदेशी असल्याच्या मुद्द्यावर कॉंग्रेसमध्ये फूट पडली. शरद पवार, पीए संगमा आणि तारिक अन्वर हे याच मुद्द्यावरून कॉंग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना केली. दुसरीकडे कारगील युद्ध पार पडल्यामुळे देशात देशभक्तीचे वातावरण तयार झाले होते. पण कोणत्याही एका पक्षाला याचा फायदा मिळू नये या उद्देशाने निवडणूक आयोगाने विशेष पत्रक जारी केले होते. त्यात आयोगाने सरकारने दूरदर्शनवर कारगील युद्धाशी निगडित माहितीपट प्रदर्शित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार दूरदर्शनवर कारगील युद्धाशी निगडित एक सीरीज दाखवली जात होती.

निवडणूक आयोगाने लष्कराच्या लोकांना प्रकाशझोतापासून दूर राहाण्यास सांगितले होते. अर्थात युद्धात पाकिस्तानला चारी मुंड्या चीत करून आपल्या लहानशा कार्यकाळातही अटल बिहारी वाजपेयी हे मजबूत इच्छाशक्ती असलेले नेते म्हणून लोकांसमोर आले होते. एवढेच नव्हे तर दोन वर्षांदरम्यान भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा घडवून आणल्या होत्या. दुसरीकडे सरकार पडल्याने मतदारांच्या सहानुभुतीचा फायदाही भाजपा घेण्याचा प्रयत्न करत होता.

निवडणुकीच्या निकालांवर परिणाम दिसून आला होता. भाजप पुन्हा एकदा मोठा पक्ष म्हणून उभा राहिला. एक वर्षापूर्वी निवडणुकांच्या तुलनेत कॉंग्रेसच्या 27 जागा कमी झाल्या; तसेच प्रादेशिक पक्षांची ताकद वाढताना दिसत होती. त्यांना एकूण 158 जागा मिळाल्या.

1952 च्या पहिल्या लोकसभेत 112 खासदार असे होते की जे दहावीही पास नव्हते. 13 व्या लोकसभेत 15 खासदार फक्त मॅट्रीक पास होते. पदवीधारक खासदारांची संख्या 177 ने वाढवून 256 पर्यंत पोहोचली होती. भाजपने 1999 मध्ये फक्त 330 जागांवर निवडणूक लढवली होती तर 1998 मध्ये त्यांनी 388 जागांवर निवडणूक लढवली होती. अटलजींच्या लोकप्रियतेनंतरही भाजपने सहकारी पक्षांना जास्त जागा दिल्या होत्या.

– या निवडणुकांमध्ये एकूण 285 महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होत्या. त्यात 49 महिला उमेदवारांचा विजय झाला होता.
– सर्वात आकर्षक मुकाबला होता मधेपुरा आणि बाढ या दोन निवडणूक क्षेत्रांमध्ये. मधेपुरामधून लालू प्रसाद यादव निवडणूक लढवत होते. तर बाढमधून बिहारचे वर्तमान मुख्यमंत्री नीतिशकुमार पाचव्यांदा जिंकण्यासाठी मैदानात उतरले होते. अनेक प्रयत्न करूनही लालूप्रसाद यादव निवडणूक हारले; तर नीतिश कुमारांनी पुन्हा बाजी मारली. मात्र केवळ 1500 मतांनी त्यांचा विजय झाला.
– 2004 च्या निवडणुकांपासून इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशीनचा वापर व्यापक रूपाने करण्यात आला. त्यापूर्वी 1999 सालच्या निवडणुकांमध्ये पहिल्यांदा या मशीन्सचा वापर करण्यात आला होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)