कहे गये दास कबीर… निसर्ग चक्र 

– अरुण गोखले 

दोहा 
जो उग्या सो अन्तभै, फुल्या सो कुमलाहीं।
जो चिनेया सो ढही पडे, जो आया सो जाहीं।।
मराठी भाषांतर 
उगवे त्याचा अंत शेवटी, फुलले ते सुकणार।
जे रचले ते पडे फिरुनी, गेले ते येणार।।
भावार्थ 
निसर्ग आणि माणूस ह्यांचा जवळचा संबंध आहे. माणूस त्या निसर्गाचाच एक भाग आहे. निसर्ग माणसाला अनेक शाश्‍वत अशाश्‍वताचे दर्शन घ्‌डवून ह्या मर्त्य जगाची ओळख करुन देत असतो. पण माणूस ते पाहूनही, दिसत असूनही, अनुभवास येत असूनही ते लक्षात घेत नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

निसर्गाने शिकवलेला धडा वाचत, नाही गिरवत नाही. कबीर माणसाला हेच सांगायचा प्रयत्न करतात की बा माणसा! तुझ्या अवती भोवतीचा निसर्ग तुला काय सांगतो आहे, काय शिकवतो आहे ते नीट साक्षीत्वाने पाहा. त्याचा बोध लक्षात घे. या जगात जे जे म्हणून उगवले, निर्माण झाले आहे, त्या सर्वाचा एक ना एक दिवस शेवट हा ठरलेलाच आहे. पहाटेच्या प्रसन्न मंगल वातावरणात एक एक पाकळी मोकळी करीत आणि आपल्या जवळच्या सुगंधाची, मोहकपणाची, सौंदर्याची उधळण करीत फुलणारी फुलं काही वेळेनंतर सुकूनच जातात ना? माणूस या निसर्गात माझं कर्तृत्व म्हणून, छाती पिटून जे जे उभे करतो. त्या त्याच्या महाल माड्या, घरदारे, भव्य इमारती, उंच उंच भव्य वास्तू ह्या सुद्धा कालांतराने कोसळून पडतातच ना. तो स्वत:ही शेवटी मातीतच जातो ना? याचा अर्थच असा आहे की आज जे रचले, ते केव्हा ना केव्हा तरी ढासळणारच, कोसळणारच. एकीकडे हे असं होत्याच नव्हत होत असतानाच दुसरीकडे मात्र एक जाते आणि त्याजागी दुसरे येते. आजा जातो नातू येतो. एक झाड कोसळून पडते तर दुसरे मातीतून हळूच डोके वर काढते. आजच्या मातीच्या ढिगाऱ्याच्या जागी उद्या नवी वास्तू उभी राहते. हे असं चालतच आणि पुढेही चालणारच कारण ते एक निसर्ग चक्र आहे. हे चक्र अविरतपणे चालू आहे. जाता जाता कबीर इथे माणसाला आणखी एक सत्य सांगून जातात कि इथं ह्या मातीत आपण जे पेरतो तेच उगवते. त्यासाठी तू सुद्धा सत्कर्मा आणि सदाचरणाचीच पेरणी कर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)