कसोटी क्रिकेटला धक्‍का लावू नका- विराट कोहली

नवी दिल्ली: कसोटी क्रिकेट हे या खेळाचे सर्वात जुने आणि तंत्रशुद्ध स्वरूप आहे. त्याच्या मूळ स्वरूपात आयसीसीने कोणत्याही प्रकारचा बदल करू नये, असे आवाहन भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने केले आहे. गेल्या काही दिवसांपासून कसोटी क्रिकेटच्या स्वरूपात काही बदल करण्याचा विचार आयसीसीने व्यक्‍त केला आहे. त्यामुळे विराटच्या या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

कसोटी क्रिकेट हा क्रिकेटमधील सर्वोत्तम प्रकार असून यात चांगली कामगिरी केल्यामुळे मिळणारे समाधान तुम्हाला इतर कोणत्याही प्रकारांत मिळत नाही, असे सांगून कोहली म्हणाला की, सध्या जरी टी-20 क्रिकेटचे वर्चस्व वाढत असले, तरी कसोटी क्रिकेटची लोकप्रियता अजूनही कायम असल्याचे दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांसारख्या देशांमध्ये होणाऱ्या सामन्यांमध्ये दिसून येते. आशिया खंडात तर कसोटी क्रिकेटची लोकप्रियता अजूनही अबाधित आहे.
तुम्ही क्रिकेटचे खरोखरच चाहते असाल, तर तुम्हाला या खेळातील सौंदर्य दिसून येते, असे सांगून कोहली म्हणाला की, यात पाच दिवसांमध्ये होणारे चढ-उतार तुम्हाला कसोटी क्रिकेटचे महत्त्व समजावून सांगते. त्याचबरोबर तुम्हाला पाचही दिवस चांगली कामगिरी करावी लागते. कधी सामन्यात तुम्ही वर्चस्व गाजवत असता, तर कधी तुम्ही पिछाडीवर असता. तुम्हाला सामन्यात सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागते, तेव्हाच तुम्ही कसोटी सामने जिंकू शकता. हा काही 20-20 किंवा 50-50 षटकांचा खेळ नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आयसीसीने पुढच्या वर्षी 2019 मध्ये कसोटी क्रिकेट चॅम्पियनशिपचे आयोजन करणार असल्याचे जाहीर केले असून 13 एकदिवसीय मालिकांचे आयोजनही करण्यात येणार आहे. तसेच त्यावेळी चार दिवसीय सामन्यांचेही आयोजन करण्यात येणार असून कसोटी क्रिकेटमध्ये बदल करून सध्याच्या पाच दिवसीय कसोटीऐवजी चार दिवसीय कसोटी सामने प्रत्यक्षात आणले जातील असा संशय सर्व स्तरांतून व्यक्‍त केला जात आहे. विराट कोहलीलाही अशा प्रकाराबद्दल तीव्र आक्षेप आहे.

कोहली म्हणाला की, आगामी कसोटी चॅम्पियनशिप अत्यंत महत्त्वाची असून त्यातून कसोटी क्रिकेटची लोकप्रियता वाढण्यास मदत होऊ शकेल. त्यामुळे सर्व संघांना आपली क्षमता आजमावण्याची संधी मिळणार आहे. तसेच त्यामुळे कसोटी क्रिकेटचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित होणार आहे. परंतु कोणत्याही कारणास्तव पाच दिवसांच्या फॉरमॅटमध्ये बदल करून कसोटी सामने चार दिवसांचे करण्यात येऊ नयेत. त्यामुळे क्रिकेटचे नुकसानच होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)