कवठ्यातील जिल्हा बॅंकेचा व्यवहार ठप्प

मलठणमध्ये इंटरनेटची केबल तुटली : शेतकरी मेटाकुटीला

सविंदणे- शिरूर तालुक्‍यातील मलठण येथे बीएसएनएलची केबल तुटल्याने कवठे येमाई येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या शाखेतील व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये संतापाची लाट उसळली आहे. सध्या विविध कार्यकारी सोसायटीमार्फत शेतकऱ्यांना खरीप हगांमासाठी कर्जवाटप करण्यात येत आहे. सविंदणे, कवठे येमाई, मुंजाळवाडी या गावांसाठी ही एकच बॅंक असल्यामुळे पैसे भरण्यासाठी, काढण्यासाठी, बॅंकेमध्ये मोठी गर्दी असते. बॅंकेमध्ये कमी कर्मचारी असल्यामुळे लोकांची कामे वेळेवर होत नाही. ऐन मार्च महिन्यापासून बऱ्याचवेळा नेटवर्क नसल्यामुळे कामकाज बंद असते. रस्त्याच्या कामामुळे ही केबल तुटल्यामुळे संपूर्ण व्यवहार ठप्प झाले आहे. त्यामुळे शेतकरी आल्यापावली परत जात आहे. येथील परिसरात यात्रा, उत्सव जवळ आला आहे. खरेदी आणि घर सजावटीसाठी पैशांची गरज आहे. तसेच लग्नकार्य असल्यामुळे खरेदीसाठी पैशांची गरज आहे. मात्र, शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.

भैरवनाथ विकास सेवा संस्थेचे सचिव रघुनाथ गोसावी म्हणाले की, बऱ्याचवेळा नेटवर्क बंद असल्यामुळे कर्जपुरवठा भरणा करणे व काढणे वेळेवर होत नाही. त्यामुळे शेतकरी नाराज होत आहेत. सरपंच वसंत पडवळ म्हणाले की, सविंदणे येथील शेतकऱ्यांना 5 किलोमीटर कवठे येथे बॅंकेत जावे लागत आहे. बॅंकेत नेटवर्क बंद असल्याने लोकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे सविंदणे येथे नवीन शाखा सुरू करण्याची मागणी आम्ही वरिष्ठांकडे केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.