कळमोडीचं पाणी आणणारच – वळसे पाटील

केंदूर-विद्यमान खासदारांनी विकासकामांच्या संदर्भात अनेक आश्‍वासने दिली. यापैकी कळमोडीचं पाणी आणणार, हे पण त्यांनी आश्‍वासन दिले होते; मात्र पाण्याचं सोडा दिलेल्या आश्‍वासनांपैकी एकही आश्‍वासन खासदारांनी पाळले नाही. आता आम्ही कळमोडीचं पाणी आणणार म्हणजे आणणारच आणि त्यासाठी आता परिवर्तनाची वेळ आलीय. तुम्ही त्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केले.

शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस व महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ केंदूर-करंदी याठिकाणी आयोजित केलेल्या सभेत वळसे पाटील बोलत होते. याप्रसंगी उमेदवार डॉ. अमोल कोल्हे, मंगलदास बांदल, माजी आमदार काकासाहेब पलांडे, मानसिंग पाचुंदकर, रेखाताई बांदल, स्वातीताई पाचुंदकर, दौलत पराड, प्रमोद पराड, मीनाताई साकोरे, सरपंच वंदना ताटे, उपसरपंच योगिता साकोरे, सूर्यकांत थिटे, शहाजी साकोरे, बाबुराव साकोरे, दीपक साकोरे, ताथवडे दादा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. दरम्यान, प्रारंभी केंदूर ग्रामस्थांनी बाजारतळ ते हनुमान मंदिर दरम्यान घोडे, बैलगाडा यांच्या लवाजम्यात भव्य मिरवणूक काढली. ग्रामदैवत केंद्राई मातेचं दर्शन घेऊन डॉ. कोल्हेंच्या सभेला सुरुवात झाली.

उमेदवार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, 2014च्या निवडणुकीत जी आश्‍वासनं दिली, त्यातली पूर्ण काहीच केली नाहीत. म्हणून आता जातीजातीत भांडणं लावून व भावनिक मुद्दे पुढे करून मतं मिळविण्याचा डाव शिवसेना-भाजपाचा आहे. तरुणांना रोजगार नाही; परंतु या तरुणांमध्ये अफाट शक्ती असते. शिवाजीमहाराज व त्यांच्या मावळ्यांनी तरुणपणातच स्वराज्याचं स्वप्नं पाहिले आणि ते अस्तित्वात आणले. त्यामुळे आजचे तरुण हे परिवर्तन घडवतील आणि सुराज्यासाठी मला संधी देतील. यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील म्हणाले लोकसभेच्या निवडणुकीत रोजगार, उद्योग, शेतीसारख्या विकासाच्या प्रश्‍नांवर चर्चा होणे अपेक्षित आहे. मात्र, पंतप्रधान मोदी व त्यांचे नेते या प्रश्‍नांवर न बोलता भावनिक मुद्द्यांवर बोलत आहेत. आज शेतकरी आनंदी आहे का? दुधाला भाव मिळतोय का? केंदूर असो की, राज्य सगळीकडे शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. शरद पवार कृषिमंत्री असताना त्यांनी घेतलेले धोरणात्मक निर्णय हे शेतकऱ्यांच्या हिताचे होते. तर, आताच्या मोदी सरकारला फक्त उद्योजकांचे हित कळते.

  • – डॉ. कोल्हेंना अभूतपूर्व प्रतिसाद!
    राष्ट्रवादी कॉंग्रेस व महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना केंदूर, पाबळ आणि इतर सर्वच ठिकाणी अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या सभेला ऐन उन्हाच्या वेळीही प्रचंड गर्दी होत होती. डॉ. कोल्हे यांची जंगी मिरवणूक काढली जात असून महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.