कळंभेत धोम कालव्यावरील पुल कोसळला

ग्रामस्थांच्या सुचनेनंतरही पाटबंधारे विभागाने केले होते दुर्लक्ष
सातारा, दि. 25 (प्रतिनिधी) जावली आणि वाई या दोन तालुक्‍यांना जोडणाऱ्या कळंभे येथील धोमच्या कालव्यावरील पुल रविवार रात्रीच्या सुमारास कोसळला. सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान, या पुलाची दुरवस्था झाल्याचे ग्रामस्थांनी वारंवार पाटबंधारे विभागाला सांगून दुरुस्तीची मागणी केली होती. मात्र, नेहमीप्रमाणे कोणत्याही बाबीचे गांभीर्य नसलेल्या या विभागाने या पुलाकडेही सोयीस्करपणे दुर्लक्ष केले होते.
कळंभे, ता. वाई येथून जावली तालुक्‍यातील गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर धोम कालव्यावर सिमेंटचा पुल बांधण्यात आला आहे. या पुलाने वाई आणि जावली या दोन्ही तालुक्‍यातील गावांना जोडले आहे. गेल्या काही दिवसांपासून या पुलाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. पुलाची एक बाजू मोडकळीस आली होती. ही बाब कळंभे येथील ग्रामस्थांनी पाटबंधारे विभागाच्या निदर्शनास आणून दिली होती. मात्र, नेहमीप्रमाणे या पुलाच्या दुरवस्थेकडेही पाटबंधारे विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केले होते. विशेष म्हणजे सध्या ऊस तोडीचा हंगाम सुरु असल्याने या पुलावरुन मोठ्या प्रमाणावर ऊसाचीही वाहतूक सुरु होती. रविवारी रात्रीच्या सुमारास अचानक या पुलाची एक बाजू पूर्णपणे कोसळली आहे. सुदैवाने रात्रीच्या वेळ असल्याने पुलावर कोणतीही वाहतूक नव्हती. अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्‍यताही नाकारता येत नव्हती.

Leave A Reply

Your email address will not be published.