कळंब-महाळुंगे रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले

वाहनचालकांनी केली धोकादायक वळणावरील झाडे-झुपडे काढण्याची मागणी

मंचर- कळंब-महाळुंगे रस्त्यावर नांदुर फाट्याजवळ असलेल्या धोकादायक वळणावर झाडे-झुडपे वाढल्याने समोरुन येणारे वाहन दिसत नाहीत. त्यामुळे येथे अपघात होवून जीवितहानीची शक्‍यता वाढली आहे. झाडे-झुडपे काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
कळंब ते महाळुंगे पडवळ, कळंब मार्गे नांदुर ते चास या दोन्ही रस्त्यावरुन रोज तीन ते चार हजार वाहने ये-जा करतात. त्यातच भीमाशंकर सहकारी साखर कारखाना आणि विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची वाहतूक करणारे ट्रॅक्‍टर, ट्रक, एसटी गाड्या, शेतीमालाची वाहतूक करणारे टेम्पो, दुचाकी इत्यादी वाहनांची वर्दळ असते. चास, साकोरे, महाळुंगे पडवळ, नांदुर, टाकेवाडी, ठाकरवाडी, विठ्ठलवाडी परिसरातील नागरिकांना कळंब आणि नारायणगाव येथे जाण्यासाठी एकमेव मार्ग आहे. तसेच पादचाऱ्यांचीही रस्त्यावरुन ये-जा असते. एका वर्षापूर्वी रस्त्याचे डांबरीकरण झाल्यामुळे येथून प्रवास करताना वाहने सुसाट असतात. वळण असलेल्या परिसरात कोणतेही सूचना फलक लावण्यात आले नाहीत. नांदुर फाट्यानजीक असलेल्या वळणावर समोरुन येणारे वाहन दिसत नाहीत. त्यामुळे जीवघेणा अपघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.
धोकादायक वळणावर किरकोळ अपघात झाले आहेत. येथील अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी करावी. तसेच आवश्‍यक त्या ठिकाणी पुढे वळण असल्याचे सूचना फलक लावावेत. धोकादायक वळणावर वाढलेल्या झाडे-झुडपांच्या फांद्या तोडाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.