कलाकार निगरगट्टच असावेत

प्रसिद्धीबरोबर जबाबदारीही येते, असे म्हणतात. बॉलिवूडमध्ये हे म्हणणे अगदी तंतोतंत खरे आहे. लवकर मिळणाऱ्या प्रसिद्धीबरोबर “ट्रोलिंग’ फ्री मिळते. शाहरुख खान, आमिर खान, सलमान यासारख्या कोणालाच या ट्रोलिंगपासून सुटका मिळालेली नाही. येथे कमकुवत मनाच्या पब्लिकला काहीच वाव नाही. थोडे जरी दुःख झालेले चेहऱ्यावर दिसले तर तुमचे काही खरे नाही. अशा ट्रोलिंगचा सामना करायचा असेल तर सोशल मिडीयावर ऍक्‍टिव्ह असलेल्या कलाकारांनी थोडे निगरगट्टच असायला पाहिजे. सोहा अली खानने आपला फंडा सांगितला आहे.

सोहाने 2004 मध्ये “ये दिल मांगे मोअर’मधून बॉलिवूडमधून पदार्पण केले होते. गेल्या 15 वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित आहे. या मधल्या काळात “रंग दे बसंती’, “तुम मिले’, “साहेब बिबी और गॅंगस्टर रिटर्न्स’ यासारख्या सिनेमातून तिने काम केले आहे. शर्मिला टागोर, सैफ अली खान, करीना कपूर खान अशा फिल्मी हस्थिंच्या फॅमिलीशी तिचा संबंध आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी म्हणून जे काही टक्केटोणपे खायला लागतात, ते तिने अगदी जवळून बघितले आहे आणि अनुभवले देखील आहे.

प्रोफेशनमध्ये अनिश्‍चितता असते का, याबाबत सोहाचे मत थोडे विचार करायला लावणारे आहे. सोशल मिडीयामुळे तुमच्याबाबत जास्तीत जास्त दखल घ्यायला उद्युक्‍त केले जाते. त्यामुळे सोशल मिडीयातील वारे कसे वाहतात, त्यावर तुमच्या प्रसिद्धीची नौका कशी प्रवास करणार हे ठरत असते. ट्रोलिंग केले जाणार हे गृहितच धरायला पाहिजे. आपल्या पोस्टवर कॉमेंट कोणी काय टाकायच्या हे आपण नाही ठरवू शकत. जर या कॉमेंटस वाचत बसलो, तर संपलेच सगळे. या कॉमेंट जशा आहेत, तशा स्वीकारायला लागलो, तरच त्याची सवय होईल, हाच आपला फंडा असल्याचे सोहाने सांगितले. सरतेशेवटी आपला स्वतःचा आनंद हीच सर्वात मोठी गोष्ट आहे. त्या आनंदासाठीच तर आपण काम करत असतो. आपण सगळ्यांना आनंदी करू शकत नाही, हे एकदा लक्षात आले पाहिजे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.