कलंदर: विक्रम आणि वेताळ

उत्तम पिंगळे

विक्रमाने आपला हट्ट सोडला नाही, वेताळाला खांद्यावर घेऊन चालू लागला. वेताळ म्हणाला, राजा एक गोष्ट सांगतो; पण ती संपेपर्यंत तू मध्ये बोलणार नाहीस. जर तू मध्येच बोललास तर मी पुन्हा झाडावर पळून जाईल.

वेताळ सांगू लागला-
आटपाट मोठे राज्य होते. त्यात हिमालयासारखा पर्वत, वाळवंट, घनदाट अरण्ये, महासागराची तटबंदी होती. गंगा, सिंधू, सतलज, चिनाब, यमुना, ब्रह्मपुत्रा अशा विविध नद्यांच्या परिसरात विविध धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत होते. कुण्या गोऱ्यांची नजर या सोन्याचा धूर निघणाऱ्या प्रदेशावर गेली व त्यांनी प्रथम व्यापारी म्हणून येथे प्रवेश केला. नंतर राजकीय बस्तान बसवून या भूमीवर राज्य करणे सुरू केले. स्थानिक लोकांना गुलामासारखे वागवू लागले. येथील कच्चा माल घेऊन त्यावर प्रक्रिया करून पुन्हा येथेच प्रचंड भावाने विकू लागले. हळूहळू स्थानिक जनतेला कळू लागले की आपण आपल्याच प्रदेशात गुलाम आहोत मग शिक्षणातून हळूहळू लोक एकत्र येऊ लागले. प्रचंड उठाव त्या गोऱ्या लोकांविरुद्ध केला गेला. सुरुवातीला बळाच्या सहायाने अनेक क्रांतिकारकांना पकडून फाशी दिली. निरपराध लोकांवर गोळ्या मारल्या गेल्या. हळूहळू उठाव भडकत गेला पुढे गोऱ्या लोकांना राज्य चालवणे कठीण होऊन बसले.

शेवटी त्या गोऱ्या लोकांनी तो प्रदेश सोडून जायचे ठरवले; पण जाता जाता धर्माचे विष एवढे ओतले होते की त्या विशाल प्रदेशाचे दोन वेगवेगळे तुकडे करून दिले. एक मोठा तुकडा व त्याच्या पश्‍चिमेला दुसरा एक छोटा तुकडा तसेच एक अत्यंत छोटा तुकडा पूर्वबाजूस निर्माण केला. अशी त्या मोठ्या प्रदेशाची फाळणी होत असताना लाखो निरपराध लोक मारले गेले. त्यातच मूळ विशाल असलेल्या प्रदेशाच्या मुगुट स्थानी असल्या नयनरम्य प्रदेशावरील अर्धाअधिक भाग त्या छोट्या भूप्रदेशवाल्यांना देऊन शेवटचा गोरा निघून गेला. पुढे त्या दोन प्रदेशांत वेगळे शासन आले; पण हा कायम वादाचा विषय रहिला. त्यातच एक तुंबळ युद्ध होऊन तो छोट्या प्रदेशाचा पूर्वेकडील बंगाली असा अत्यंत छोटा वेगळा देश केला गेला. अलीकडे त्या नयनरम्य परिसराचा विशेष दर्जा काढून घेतला गेला पुढे तो ही मोठ्या प्रवेशाचा इतर प्रदेश प्रमाणेच राहील असा कायदा आणला. असे केल्याने तर त्या छोट्या प्रदेशाचा तिळपापडच झाला. जागतिक पातळीवर त्याने आरडाओरडा केला. नयनरम्य प्रदेशातील पुढाऱ्यांनाही नजरकैदेत ठेवले गेले. राजा आता मला सांग की, त्या प्रदेशाचा विशेष दर्जा काढत असताना त्या प्रदेशातील सरदारांना विश्‍वासात का घेतले गेले नाही?

विक्रम म्हणाला, वेताळा मुळातच धार्मिक बाबतीचे प्रदेश वेगवेगळे केल्यावर त्या नयनरम्य भागाविषयी वाद होयला नको होता. पण एवढी वर्षे मोठ्या प्रदेशातील एकाच पक्षाचे शासन असताना त्यांनी केवळ धार्मिक चांगूलचलन केले व त्या नयनरम्य भागातील अल्पसंख्यांकाना परागंदा केले. अनेक चर्चा होऊन त्यातून काही निष्पन्न झाले नाही. त्या नयनरम्य प्रदेशातील सरदार अब्जाधीश झाले. दुसरीकडे सामान्य रयत आहे तशीच राहिली. म्हणूनच त्या अप्पलपोटी सरदारांना विश्‍वासात घेण्याची काहीच गरज नव्हती. मोठ्या प्रदेशाच्या शासनाने योग्य निर्णय घेतला आहे कारण इतके वर्षं फक्‍त फुटीरवाद जोपासला गेला. राजाने मौन सोडताच वेताळ म्हणाला, पण राजा तू बोललास त्यामुळे हा मी निघालो, असे म्हणून वेताळ पुन्हा झाडावर जाऊन लोंबकळू लागला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)