#कलंदर: मुरली सर व थालीपीठ… 

– उत्तम पिंगळे 
स्थळ मातोश्री. उधोजीराजे सदरेवर होते काही दुसऱ्या तिसऱ्या फळीतील सरदारही होते इतक्‍यात छात्र युवराज उधोजीराजांच्या कानात सांगतात की ‘जोशी सर’ येत आहेत. त्यावर उधोजीराजे म्हणतात की, “एवढे कानात काय सांगताहात?’ त्यावर छात्र युवराज म्हणतात की, जोशी सर म्हणजे “मुरली मनोहर जोशी सर. ‘मुरली सर’. ताबडतोब दरबार बरखास्त केला जातो. मग सदरेवर फक्त उधोजीराजे व छात्र युवराज राहतात. मुरली सर येतात (त्यांनाही मराठी येतं)
मुरली सर : (नमस्कार करत) नमस्ते राजे, नमस्ते युवराज.
उधोजीराजे : नमस्ते सर. या बसा. (छात्र युवराज त्यांच्या पाया पडतात)
मुरली सर : विजयी भव:।
उधोजीराजे : एकदम अचानक येणं झालं, म्हणून विचार करत होतो.
मुरली सर : हे बघा आता 2019 च्या निवडणुका जवळ आल्या आहेत. आपण केंद्रासह राज्यात मित्र पक्ष आहोत. पण आपण सतत एकमेकांवर जाहीर आरोप करीत आहोत, म्हणून…
उधोजीराजे : सर आपण वयाने व मानाने मोठे आहात आपला व थोरल्या महाराजांचा स्नेह चांगलाच होता हे आम्ही जाणतो. आम्ही आपणांस कधीच परके समजत नाही.
मुरली सर : म्हणूनच म्हणतो की हे मतभेद आता थांबवायला हवेत.
उधोजीराजे : पण आपण पाहताहात की, आमच्या विरोधास न जुमानता परस्पर निर्णय घेतले जात आहेत.
मुरली सर: मी याविषयी येथील सुभेदारांशी बोलणार आहे. थोरले राजे व प्रमोदजी असताना असा प्रश्न आला नाही. ( इतक्‍यात सेवक गरमगरम थालीपीठ लोणी चहा पाणी घेऊन येतो)
उधोजीराजे : सर हे घ्या गरमागरम थालीपीठ. येथील खास मेनू आहे.
मुरली सर : (थालीपीठ खाऊ लागतात) वा राजे, मी हे खाल्लेलं आहे! काय नाव म्हणालात?
उधोजीराजे : याला थालीपीठ म्हणतात तांदूळ, वेगवेगळ्या डाळी, धने, थोडी ज्वारी, बाजरी अशा धान्याचे योग्य मिश्रण करून त्यात तिखट मीठ टाकून तव्यावर केली जाते.
मुरली सर : खूप छान मला आवडले. पण आता हेच थालीपीठ फक्‍त तांदूळ किंवा धान्य वापरून केले तर ते चांगले लागेल का?
छात्र युवराज : बिलकुल नाही वेगवेगळ्या घटकांचे मिश्रण एकजीव झाल्याशिवाय असा पदार्थ बनत नसतो.
मुरली सर : बरोबर. मला माहीत आहे थोरल्या वहिनीसाहेबांच्या हाताचे हे थालीपीठ मी खाल्लेले आहे. आजही तशीच चव आहे.
उधोजीराजे : धन्यवाद; आजही तसेच बनवले जाते.
मुरली सर : राजे, आपण विचारी आहात युवराजही प्रगल्भ बुद्धीचे आहेत ज्याप्रमाणे विविध धान्य यांचे योग्य मिश्रण करून थालीपीठ केले जाते, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना 2019 साठी विविध पक्ष एकत्र येऊन लढाई जिंकायची आहे. पुन्हा सत्तेच्या थालीपीठासाठी भगवा, पांढरा, हिरवा, निळा, केशरी सर्वांना एकत्र यावे लागेल, यातच सर्वांचे हित आहे. माझा हा वडीलकीचा सल्ला घ्यावा आणि निर्णय घ्यावा. (थोरल्या महाराजांच्या फोटोला मुजरा करून निघून जातात. त्यांच्या पाठमोऱ्या देहाकडे उधोजीराजे विचारपूर्वक बघत असतात. छात्र युवराज हातातील थालीपीठा कडे विस्मयकारी नजरेने पाहात असतात)
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)