#कलंदर: ब्रेकिंग न्यूज ! 

उत्तम पिंगळे 
आजकाल आपण विविध चॅनल्सवर व बातम्यांबरोबर ब्रेकिंग न्यूज नेहमी ऐकत असतो. अलीकडे अशा न्यूजचे पीकच निर्माण झालेले आहे. काहीही झाले की, ब्रेकिंग न्यूज. बरं या बातम्या पाहाल किंवा ऐकाल त्या कशाच्या असतात, एक तर कुठे मोठा दरोडा पडला. कुठे मोठा अपघात झाला.कुठे क्रिकेटची मॅच जिंकली अशा टाइपच्या असतात. नंतर स्टॉक मार्केट चढले का पडल, कुणा मोठ्या नेत्याचे पक्षांतर-अटक किंवा काही आक्षेपार्ह विधान, मोठमोठ्या सेलिब्रिटींचे एंगेजमेंट वा लग्न वा ब्रेकअप; उद्योगपतींचे पलायन; वेगवेगळ्या नेत्यांवरच्या केसेसमध्ये कोर्टाचे अटक व जामीन यावर अमक्‍यास अटक वा कोर्टाचा दिलासा; अशा स्वरूपाच्या असतात. घरगुती स्वरूपातील भांडणे हत्या आत्महत्या वगैरे असेच त्यांचे स्वरूप सर्वत्र दिसते.
नीट तपासले असता सामान्यांच्या बाबतीत या बातम्यांमधून काहीही निष्पन्न होत नसते. तरीही त्या बातम्या प्रेक्षकांच्या माथ्यावर मारल्या जातात. काही विशेष बातमी असेल तर ती जरूर पुन्हा पुन्हा सांगितली जावी. अमुक अमुक अभिनेत्रीची बॅग वा मोबाइल विमान प्रवासात चोरीला गेला. आता ही काय महत्त्वाची बातमी आहे का? पण असं म्हटलं जातं की, “कुत्रा माणसास चावला तर ती बातमी नसते; पण माणूस कुत्र्यास चावला तर बातमी होते.’ आजकालची चॅनल्स्‌, सोशल मीडिया तसेच अनेक न्यूज चॅनेल्स आपापला टीआरपी वाढण्याकरिता नेमक्‍या अशाच बातम्यांच्या शोधात असतात. लोकही अशा बातम्या आवडीने बघतात व असे बघणारे असल्यामुळेच असल्या बातम्यांचे पेव फुटते. आजकाल सर्वांचेच जगणे टेंशनयुक्‍त झालेले असल्यामुळे अशा प्रकारच्या बातम्यांमुळे त्यांना थोडा विरंगुळा मिळतो. उलट कित्येक बातम्या एवढ्या महत्त्वाच्या असतात की, त्या लोकांपर्यंत पोहोचणे आवश्‍यक असते. विविध संस्था वा व्यक्ती ज्यांनी समाजसेवेसाठी खूप काही केलेलं असतं.
ग्रामीण आरोग्य सुधार कुपोषण निर्मूलन, बालविवाह, संघटित होऊन केलेले कार्य या सर्वांची अभावानेच नोंद होत असते. उलट या वर्षीचे आपण पद्म पुरस्कार पाहिले असता सेलिब्रिटी राजकारण बाजूला सारून विविध व्यक्‍ती व संस्थांना पुरस्कार मिळताना दिसतो. खरोखरच त्यांचे कार्य अद्‌भुत असे आहे. सरकारी मदत वगैरे न घेता या संस्था व व्यक्‍ती आपले साध्य मिळवण्याकरता
निःस्वार्थपणे कार्य करीत असतात. मग शिक्षण, आरोग्य, शेती, दारूबंदी, हुंडाबळी, लघु उद्योग, प्राणी, पक्षी यावरची भूतदया असो अशा विविध लोकांना व संस्थाना गौरवले गेले. पद्म पुरस्कार मिळाल्यावर आता चॅनेल्स, वृत्तपत्रे त्यांचा शोध घेत आहेत व त्यांच्याबाबतच्या बातम्या छापून येत आहेत. लोकांना आता त्यांच्याबाबत माहिती मिळू लागलेली आहे. त्यांच्याकडून अशी प्रेरणा घेऊन आता नव नवीन संस्था व व्यक्तीही अशा कार्यात पडू लागलेले आहेत.
तात्पर्य असे की, टीआरपी सांभाळत असताना जाहिरातींचे दडपण असताना वास्तव अशा बातम्या खऱ्या ब्रेकिंग न्यूज ठरू शकतात; पण त्या ब्रेकिंग न्यूज म्हणून जरी नाही दिल्या तरी किमान न्यूज म्हणून तरी त्या प्रसारित व्हाव्यात. यासाठी सर्व चॅनेल्स व वृत्तवाहिन्या पुढे सरसावल्या तरी लोकांना बरेच काही समजेल. मीडियाने किमान सामाजिक जबाबदारी ध्यानात ठेवून तरी अशा बातम्यांना स्थान देणे आवश्‍यक आहे. ब्रेकिंग न्यूजपेक्षा वा किमान ब्रेकिंग न्यूजबरोबर मेकिंग न्यूजही असाव्यात हीच अपेक्षा.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)