कलंदर पुनरागमनायच.. 

उत्तम पिंगळे
परवा सायंकाळी सर्वांनी गणरायांना भावपूर्ण निरोप दिला. महाराष्ट्राच्या प्रमुख सणाची सांगता झाली.तिकडे कैलासावर मूषकासह श्री गणेश प्रगट झाल्याने पुन्हा चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. अनेक देवगण जातीने उपस्थित राहिले. जवळ जवळ सारा दिवस गणरायांच्या स्वागतात गेला. सायंकाळी श्री गणेश मूषकासह माता पार्वतीच्या कक्षात गेले. श्री गणेशाने माता पार्वतीस वंदन केले. एवढ्यात नारायण… नारायण… ही गर्जना करत देवर्षी नारदही येथे प्रकट झाले.
नारदमुनी व गणेशाने एकमेकांस अभिवादन केले. माता पार्वतीने गणेशासाठी आज खास बेत केला होता. माता पार्वतीने गणेश व मूषकास पृथ्वीवरील दहा दिवस चांगलेच मानवले असल्याचे जाणले. पृथ्वीतलावर जाताना गणेशास एक कागद दिला होता तोच कागद गणेशाने पुन्हा आणून त्याच्या मागे पृथ्वीवरील घडामोडींचा रिपोर्ट दिला. श्री गणेश सांगू लागला.
विविध गावात एक गाव एक गणपती हे सूत्र लागू होत असतानाच एकाच घरात वेगवेगळे गणपती स्थापन झाल्याचेही दिसून आले. नानाविध पदार्थांचे सेवन करण्यास मिळाल्याने खूप आनंद झाला. यावर मातेने गणेशास चायनीज वगैरे काही खाल्ले नाही ना, अशी विचारणा केली. यावर श्री गणेशाने हळूच नारद मुनींकडे पाहात नकारार्थी मान डोलावली. कित्येक ठिकाणी आवाजाचा गोंगाट होताच. कित्येकदा येथे पोलीस आल्यावर आवाज कमी केला जायचा व पोलीस गेल्यानंतर पुन्हा आवाज वाढवला जायचा.एके ठिकाणी तर आवाज एवढा मोठा होता की मी स्वतः तेथील वीज बंद पाडली. परंतु भक्‍तगणांकडे जनरेटर नावाचे यंत्र असल्याने त्यांनी ताबडतोब मंडपात गुन्हा वीज चालू केली.
मग इतर जनतेस त्रास नको म्हणून तेथील वीज पुन्हा चालू केली. कोकण प्रांतात बहुतेक ठिकाणी गौरींबरोबर विसर्जन पार पडले ह्या वेळी तेथे खूपच चांगला उत्साह होता. मोठमोठ्या मंडळांना कोट्यवधी रुपयांची रोख व आभूषणे अशा प्रकारच्या देणग्या मिळालेल्या आहेत. यातील अनेक मंडळे लोकाभिमुख कार्य करीत आहेत. अशा प्रकारच्या मंडळांनी विविध प्रकारची व्याख्याने, स्पर्धा आयोजित केल्या होत्या. काही मंडळात बाकी नुसताच गोंधळ होता व सतत पत्ते खेळले जायचे.
मग गमतीचा भाग विचारला असता गणराज म्हणाले की एका मुलाने खाऊच्या पैशातून मला मोदक आणले व आई बाबा मला मोबाइल व लॅपटॉपवर खेळू नको असे सतत सांगत असतात तसे सांगू नये अशी प्रार्थना केली.
मी अभ्यास करीतच असतो, असेही तो म्हणाला. त्याच वेळी त्याच्या आईने माझ्याकडे या मुलाला मोबाइल व कॉम्प्युटर खेळापासून सोडव अशी प्रार्थना केली. अजूनही मला आता प्रश्न पडलाय की यांचं काय करायचे? तसेच एका आमदारांनी माझ्याकडे माझी आमदारकी पुन्हा राहो असे साकडे घातले. त्याचे कामही चांगले आहे म्हणून मनातूनच तथास्तु म्हणालो. पण त्याच रात्री त्याच्या विरोधात उभा राहणारा नेता माझ्याकडे आला व त्याने या वेळी मला आमदारकी मिळावी म्हणून गाऱ्हाणे घातले व त्यालाही मी चुकून मनातून तथास्तू म्हणालो. पार्वती माता यावर म्हणाली की, मग आता काय करणार? यावर गणेश म्हणे की, एकाला विधानसभेवर नेतो व दुसऱ्याला विधान परिषदेवर घेण्यासाठी श्रेष्टींच्या मनात भरवून देतो.
एकंदरीत पृथ्वीवरचा प्रवास खूप चांगला झाला, असे गणेशाने नमूद केले. मग नारदमुनींनी निरोप घेतला. माता पार्वतीने गणेश व मूषक यांच्याकडे रोखून पाहिले व आता तुम्ही आराम करा. उद्यापासून रोज कैलास पर्वताला दोघांनी धावत प्रदक्षिणा घालायची आहे. मला तुमचे दहा दिवसांचे बाळसे कमी करायचे आहे. जशी आज्ञा माते असे म्हणून गणेशाने वंदन करून पार्वती मातेचा निरोप घेतला.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)