#कलंदर : गुरुपौर्णिमा व ग्रहण 

– उत्तम पिंगळे 

यावेळी गुरूपौर्णिमेलाच शतकातील सर्वात मोठ्या चंद्रग्रहणाचा योग होता. कित्येक ठिकाणी लोकांनी गुरूंचे पूजन सायंकाळी लवकरच केले कारण रात्री ग्रहण सुरू होणार होते. अनेक नेत्यांनीही आपापल्या गुरूंची पौर्णिमेच्या आधीच विशेष भेट घेतली, कारण गुरुपौर्णिमेला सर्वच ठिकाणी खूप गर्दी असते. गुरु पूजनाबरोबरच अनेकांनी गुरूंना या ग्रहणाचा आपल्यावर काय प्रभाव पडेल असाही प्रश्न विचारला होता. पूर्वी अनेक राजकीय गुरूंचा थेट राजकीय लोकांत राबता असायचा; पण आता तो थोडा कमी झालेला आहे. आता कोणकोणत्या राजकीय नेत्याचा कोण गुरू आहे, असा खासगी प्रश्न येथे विचारू नये. एक मुक्त पत्रकार जसे म्हणतो की, “हमारे जासूस चारो तरफ फैले हुए हैं,’ त्याप्रमाणे आमच्या हाती खूप वेगवेगळी माहिती आली आहे. तिच पुढे देत आहोत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बंगालच्या दीदींना म्हणे गुरू अनुग्रह झाला व वेस्ट बंगालमधील वेस्ट शब्द काढून राज्याचे नाव बदलावे. एक तर इंग्रजीत “वेस्ट’चे अनेक अर्थ होतात. म्हणून बांगला नाव दिल्यास आपली आणखी प्रगती होईल. त्याप्रमाणे त्यांनी विधानसभेत ठराव आणून नावही बदलले आहे. मायाताईंना म्हणे गजलक्ष्मीची पूजा केल्यास राजकीय भरभराट होईल असे सांगितले. त्यावर त्यांनी थोडा विचार केला. शेवटी हत्तीवर लक्ष्मी बसून पूजा केली असे ऐकिवात आहे. दिल्लीतील युवराजांचीही, पंतप्रधानांना मिठी मारल्याने देशात कशी का होईना, प्रसिद्धी आधीच झालेली आहे. यादव कुलीन राजकुमारांसही सायकल व हत्ती यांचा समन्वय ठेवून राजकीय चाल खेळण्यास सांगितले आहे म्हणून ते जरा जास्तच चिंतातूर आहेत. दुसरीकडे ‘कंदीलवाल्यांना’ कंदिलाचा ‘प्रकाश’ जरा वाढवण्यास सांगितले आहे. त्यामुळे चारा व धान यातील फरक समजेल. एका मोठया डाव्या नेत्यांनीही तिसऱ्या आघाडीच्या प्रयोगास या ग्रहणामुळे काय होईल असा प्रश्न केला होता. त्यावर त्यांचा गुरूने प्रथम ‘एक’ तर माहिती आहे पण दुसरी आघाडी कोणती, असा प्रतिप्रश्न केला आहे.

महाराष्ट्रातील सुभेदारांनाही शनिची आराधना करण्यास सांगितले आहे. तसेच त्यांचे समर्थक राजे यांनीही गुरूंना “एकला चलो रे’ केल्यास काय होईल असा प्रश्न केला. त्यावर त्यांच्या गुरूने असे न करता “असून अडचण व नसून खोळंबा’ हेच धोरण योग्य ठरेल असे सांगितले. आपले प्रधानमंत्री तर रोज 16-18 तास काम करतात व असेच करत रहा असा संदेश त्यांच्या गुरूंनी दिला आहे. जम्मू काश्‍मीर राज्यपालांनीही गुरूंची भेट घेतली त्यावेळी गुरूने येथे कायमच अलीकडे ग्रहणच असते असे सांगून ‘लष्कर व चर्चा’ या दोन्ही मार्गांचा अवलंब करावा असे सांगितले. एका बड्या राजकीय नेत्याने आपल्या गुरूला विचारले की, पाकिस्तानात आता इम्रान खान सत्तेवर आलेला आहे. अशा वेळी नवे सरकार व भारत सरकार यांच्या संबंधांवर या ग्रहणाचा काय परिणाम होणार आहे? या प्रश्नावर त्यांचे गुरू मंद हसून म्हणाले की पाकिस्तानात सरकार चालवणे म्हणजे लष्कराच्या हातातील बाहुले बनून राहणे आवश्‍यक असते. या वेळी प्रत्यक्ष निवडणुकीनंतर आघाडी मिळून इम्रान खान पुढे आलेला आहे व भारताबद्दल त्यांचे वक्तव्यही आशादायी आहे. त्यामुळे सदरचा बदल म्हणजे फक्त ‘दगडापेक्षा विट मऊ’ असेच समजावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)