कर्तव्यदक्ष परिवहन अधिकारी : योगेश बाग

सातारा आर. टी. ओ. कार्यालयामध्ये योगेश बाग यांचा कार्यकाळ बराच मोठा आहे. त्यांची नोकरीची कारकिर्द 11 फेब्रुवारी 1985 पासून सुरू झाली. 34 वर्षे त्यांनी शासनामध्ये नोकरी केली आहे. सातारा जिल्हा हा शासकीय अधिकाऱ्यांना आवडतो, असे सर्वच जण सांगतात. सातारा जिल्हा हा पूर्वीचा पत्री सरकार म्हणून प्रसिद्ध होता. त्यापूर्वी अजिंक्‍यतारा ही मराठी साम्राज्याची राजधानी आणि स्वातंत्र्यानंतर यशवंतराव चव्हाण यांचा सातारा जिल्हा म्हणून देशभरात प्रसिद्ध. या जिल्ह्यात योगेश बाग यांना 2000 ते 2003, 2006 ते 2009 आणि आता 2015 ते आजपर्यंत परिवहन अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी या संधीचे अक्षरशः सोने केले आहे. योगेश बाग हरहुन्नरी असे व्यक्‍तिमत्व आहे.

लेखक, संवेदनशील व्यक्‍ती म्हणून त्यांचे विशेष नाव घेतले जाते. सर्वसामान्यांना दिलासा देणारे आणि आपल्या शासकीय नोकरीत सर्वांना बरोबर घेवून जाणारे हे व्यक्‍तिमत्व आपल्या वरिष्ठांचे कायमच आधारस्तंभ राहिले आहेत. वरिष्ठांनी योजना सांगायची आणि ती वेळेचे बंधन पाळून अहोरात्र वैचारिक दृष्टीकोन ठेवून त्याची पूर्तता करायची आणि आपल्या विभागाचे नाव महाराष्ट्रभर गाजवायचे व एक नवा पॅटर्न रुजवायचा ही त्यांची धडाडी. म्हणूनच त्यांचा आज निरोप समारंभ सातारा परिवहन विभागाच्या आवारात होत आहे. त्यांनी सातारा परिवहन विभागात जे काही अमुलाग्र बदल केले आहे ते या निमित्ताने महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांना बघावयास मिळणार आहेत आणि आपल्या या सहकाऱ्यांसारखे काम करण्याची स्फूर्ती व चेतना मिळणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आपल्या नोकरीच्या कारकिर्दीत त्यांनी दोन पुस्तके लिहिली. विशेष आनंदाची बाब म्हणजे ही दोन्ही पुस्तके सातारा येथील नोकरीच्या कालावधीत प्रसिद्ध झाली आहेत. अपघात आणि आपण हे पुस्तक ऑगस्ट 2001 मध्ये प्रकाशित झाले आणि त्याची 6 वी आवृत्ती 2017 मध्ये प्रकाशित झाले आहे. दुसरे पुस्तक कार ड्रायव्हिंग शिका आणि शिकवा हे सप्टेंबर 2017 मध्ये प्रकाशित झाले.

योगेश बाग यांचा वावर सर्वच क्षेत्रात आहे. साहित्य वाचनाची आवड त्यांची विद्यार्थ्यांपासून ते मोठ्यापर्यंत मार्गदर्शक आहे. बालकवी, बहिणाबाई चौधरी व आचार्य अत्रे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्याच कवितेवर आधारित कार्यक्रम “कविता मनामनातील’ दीपलक्ष्मी पतसंस्थेतर्फे घेण्यात आला होता. त्यावेळी त्यांचे बालकवी बहिणाबाई आणि आचार्य अत्रे यांच्या कवितेवरील मनोगत मोठमोठ्या वक्‍त्यांच्या तोडीचे होते. शासकीय नोकरीत असूनही साहित्यिक जाण आणि अभ्यास याचे ज्ञान त्यांचे अफाट आहे. राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2018 अंतर्गत त्यांनी सातारा जिल्हा वेगवेगळ्या कार्यशाळा आणि शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रबोधन या माध्यमातून ढवळून काढला आणि महाराष्ट्रला प्रेरणा दिली. अपघाताच्या प्रमाणाचा वयोगट हा साधारणपणे 15 ते 35 असून त्यासाठी विशेष प्रबोधन कायमच ते करीत असतात.

सेवानिवृत्तीनंतर ते या सर्व गोष्टींचा लाभ या वयोगटासाठी करुन देणार आहेत. योगेश बाग यांनी आपली नोकरीची कारकिर्द सातारा जिल्ह्याबरोबरच ठाणे, नाशिक, श्रीरामपूर, कोल्हापूर, पुणे आणि परिवहन आयुक्‍त कार्यालय या ठिकाणी यशस्वी केली आहे. त्यांचा रस्ता सुरक्षा हा कायमच जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. त्यांनी आपल्या संकल्पनेतून रेखाटलेल्या व्यंगचित्रांच्या पोस्टर्सशिवाय राज्यात एकही रस्ता सुरक्षा सप्ताह संपन्न झालेला नाही. ही व्यंगचित्रे त्यांनी आता सातारा परिवहन विभागाला भेट दिली आहेत. कारण त्यांची शेवटची कारकिर्द सातारा येथे संपन्न होत आहे.

– शिरीष चिटणीस, सातारा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)