करोना साथीत गुन्ह्यांची संख्या 28 टक्‍क्‍यांनी वाढली

नवी दिल्ली – करोनाची साथ असणाऱ्या 2020 या वर्षात ही साथ नसणाऱ्या 2019 या वर्षाच्या तुलनेत 28 टक्‍क्‍यांनी गुन्हे वाढले असल्याचा अहवाल नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने अलीकडेच जारी केलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. मात्र यातील सर्वाधिक गुन्हे हे करोना आचारसंहिता भंगाचे असून अन्य गुन्ह्यात मात्र घट झाली आहे.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने आपला 2020 चा अहवाल बुधवारी प्रकाशित केला. भारतीय दंड संहितेच्या कलमाचे उल्लंघन केल्याचे 66 लाख एक हजार 285 गुन्हे नोंदवण्यात आले. त्याच्या आदल्या वर्षी ही संख्या 42 लाख 54 हजार 356 इतकी होती. त्याशिवाय 23 लाख 46 हजार 929 गुन्हे स्थानिक कायदे आणि विशेष कायद्यांखाली नोंदवण्यात आले आहेत. त्यामुळे 2019 मध्ये प्रति लाख लोकसंख्येमागे गुन्ह्यांची सरासरी 385 होती, ती 2020 मध्ये 487.8 इतके झाले आहे.

भारतीय दंड संहितेच्या कलम 188 नुसार (सरकारी अधिकाऱ्यांन िदिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणे) नोंदवलेल्या गुन्ह्यात सर्वात जास्त वाढ झाली आहे. 2019 मध्ये अवघे 29 हजार 469 गुन्हे या कलमाखाली नोंदवले गेले होते. ते 2020 मध्ये सहा लाख 12 हजार 179 गुन्हे नोंदवण्यात आले. भारतीय दंड संहितेच्या अन्य कलमांखाली 2019 मध्ये दोन लाख 52 हजार 268 गुन्हे नोंदवण्यात आले. त्याची संख्या वाढून ती 2020 मध्ये दहा लाख 62 हजार 399 वर पोहोचली आहे, असे या अहवालात नमूद केले आहे.

गृहमंत्रालयाने जारी केलेल्या या अहवालात करोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर भादंवि 188 आणि आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या शिवाय स्थानिक कायद्यांनुसार दाखल झालेल्या गुन्ह्यांचा विचार करता 2019 च्या तुलनेत 16 लाख 43 हजार 690 अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोविड आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या गुन्ह्याचा यात समावेश आहे. त्यामुळे पारंपरिक स्वरूपाच्या गुन्ह्यात सुमारे दोन लाख गुन्ह्यांनी घट होउनही नोंदवलेल्या गुन्ह्यांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे.

25 मार्च ते 31 मे या कालावधीत देशात पूर्ण लॉकडाऊन होता. त्यामुळे महिला, मुले आणि ज्येष्‌ठ नागरिकांविरूध्दचे गुन्हे, चोरी, दरोडे आणि जबरी चोरी सारख्या गुन्ह्यात घट झाली आहे. मात्र, 2020 मध्ये सार्वजनिक शांततेस बाधा आणल्याच्या गुन्ह्यात 2019 च्या तुलनेत गेल्या वर्षी दाखल झालेल्या गुन्ह्यांची संख्या 12. 4 टक्‍क्‍यांनी वाढली आहे.
अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती यांच्यावरील अत्याचाराच्या घटनांत 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये लक्षणीय म्हणजे 10 टक्के वाढ झाली आहे. अनुसुचित जाती जमातीवरील अत्याचाराच्या देशांत 50 हजार 291 गुन्हे नोंदवण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.