कराड वाहतूक नियंत्रण शाखेचे स्थलांतर

शिवाजी वसतिगृहातील वर्दळ वाढणार
कराड, दि. 29 (प्रतिनिधी) -येथील शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या वाहतूक नियंत्रण शाखेचे शनिवारी बसस्थानकानजीकच्या शिवाजी वसतिगृहाच्या इमारतीत स्थलांतर झाले. याच वसतिगृहाच्या इमारतीत प्रांत कार्यालयासह कृषी विभाग आणि नगर भूमापन कार्यालय कार्यरत आहे. त्यामुळे येथे नागरीकांची मोठी वर्दळ असते. आता वाहतूक शाखाही स्थलांतरीत झाल्याने प्रांत कार्यालयाचे आवार वाहनांच्या गर्दीने फुलून जाणार आहे.
वाहतूक शाखेचे कामकाज वाढल्याने आणि शहर पोलीस ठाण्याच्या आवारातील वर्दळ कमी व्हावी, या उद्देशाने शहर वाहतूक शाखा स्थलांतरीत करण्याचा निर्णय झाला आहे. जिल्हा परिषदेच्या मालकीचे असलेल्या शिवाजी वसतिगृहात प्रांत कार्यालयासह उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय होते. तालुका पोलीस ठाणे आणि पोलीस उपअधीक्षक कार्यालयाचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रांत कार्यालयातील डीवायएसपींचे कार्यालय तालुका पोलीस ठाण्याच्या इमारतीत स्थलांतर झाले. त्यानंतर शहर पोलीस ठाण्यातील वाहतूक शाखा स्वतंत्र आणि प्रशस्त जागेत स्थलांतरीत करण्याचे निश्चित करण्यात आले. जून महिन्यातच हे कार्यालय स्थलांतरीत होणार होते. मात्र, प्रशासकीय कारणास्तव स्थलांतर पुढे ढकलण्यात आले होते. तत्पूर्वी कार्यालयाची अंतर्गत रंगरंगोटी, दुरूस्ती करून घेण्यात आली होती. या वसतिगृहात एकूण 26 खोल्या आहेत.
शनिवारी रात्री पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांच्या हस्ते आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या उपस्थितीत नवीन जागेतील वाहतूक शाखेचा शुभांरभ करण्यात आला. या ठिकाणी फक्त वाहतूक नियंत्रण शाखेचे कामकाज होणार आहे. अपघात विभागाचे कामकाज शहर पोलीस ठाण्यातील जुन्याच कार्यालयातून होणार आहे. या शाखेत एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, 36 पुरूष आणि 3 महिला, असे एकूण 40 जण कार्यरत आहेत. शाखेचा शुभारंभ झाल्यानंतर आता कार्यालयीन साहित्य नव्या जागेत आणण्याचे काम सुरू आहे. वाहतूक शाखेच्या ताब्यात असणारा मुद्देमाल (ताब्यात घेतलेली वाहने) सुध्दा नवीन कार्यालयाच्या मोकळ्या जागेत आणून ठेवला जाणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)