कराड पालिकेची वाटचाल शतकोत्तर अमृतमहोत्सवाकडे

सुनीता शिंदे 

कराड  -संपूर्ण कराडवासियांची मातृसंस्था असणाऱ्या कराड नगरपालिकेची वाटचाल शतकोत्तर अमृत महोत्सवाकडे सुरू आहे. आज, मंगळवार दि. 15 सप्टेंबर रोजी कराड पालिकेचा 165 वा वर्धापनदिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. पालिकेचे नेतृत्व करणाऱ्या अनेकांच्या गळ्यात पुढे मंत्रिपदाची माळ पडली आहे. अनेक राजकीय स्थित्यंतरे कराड येथूनच घडत असल्याने पालिकेची वास्तू म्हणजे दुसरी “असेम्बली’च आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

कराड नगरपालिकेला ब्रिटीश कालखंडाचा वारसा आहे. दि. 15 सप्टेंबर 1855 रोजी स्थापन झालेल्या नगरपालिकेकडे आजपर्यंत स्वातंत्र्य लढ्यासह सध्या सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीची प्रमुख साक्षीदार म्हणून पाहिले जाते.

संयुक्‍त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून स्व. पी. डी. पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व अशोक चव्हाण तसेच माजी सहकारमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर, शामराव आष्टेकर आणि सध्या महाविकास आघाडीचे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील या मान्यवरांचा वारसा कराड नगरपालिकेला आहे.

त्याचबरोबरच कराड नगरपालिकेने अनेक स्वतंत्र विचारसरणीचे नगरसेवक व नगराध्यक्षही पाहिले आहेत. तसेच अनेक वादळे झेलली आहेत. राजकारण, समाजकारण यातील बदल पाहिले आहेत. कित्येक नव्या व समाजाभिमुख घटनांची सुरूवात या वास्तूमधूनच झाली आहे.

अशा या नगरपालिकेने 165 वर्ष नुकतीच पूर्ण केली. यानिमित्त मंगळवारी लोकशाही आघाडी व पालिका प्रशासनातर्फे केक कापून वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, मुख्याधिकारी रमाकांत डाके, यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.