कराडातही दगडफेक टायर जाळले, वाहतूक रोखली

कराड, दि. 25 (प्रतिनिधी)- सकल मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने बुधवारी पाळण्यात आलेल्या बंद दरम्यान शहर आणि परिसरात हिंसक पडसाद उमटले. बसस्थानकासमोरील बंद असलेल्या हॉटेल अलंकारवर रॅलीतील काही युवकांनी दगडफेक केली. कोल्हापूर नाका, हॉटेल पंकजसमोर महामार्गावर वाहतूक रोखून धरण्यात आली. तसेच आबईचीवाडी येथे टेम्पोच्या काचा फोडण्यात आल्या, तर ओगलेवाडीतील रेल्वे पुलावर, वारूंजी फाटा येथे रस्त्यावर टायर पेटवून वाहतुकीला अडथळे आणले. मंडई परिसरात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, या बंदला शहर, उपनगरांसह ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्‍यक सेवा वगळता संपूर्ण तालुक्‍यातील व्यवहार बंद होते. शाळा, महाविद्यालये बंद राहिल्याने सर्वत्र शुकशुकाट जाणवला. एसटीच्या फेऱ्या आणि वडापही बंद होते.
ओगलेवाडी येथील रेल्वे पूलावर टायर जाळण्यात आल्याची वार्ता सकाळी सर्वत्र पसरली. या पडसादामुळे लोकांनी घराबाहेर पडणे टाळले. चिपळूण-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांना पांगविले. रस्त्यातील पेटते टायर बाजूला काढून वाहतूक पूर्ववत केली. त्यानंतर आंदोलकांनी शहर आणि उपनगरातून मोटरसायकल रॅली काढली. या रॅलीदरम्यान बसस्थानकासमोरील हॉटेल अलंकारवर रॅलीतील काही युवकांनी दगडफेक केली. त्यात हॉटेल इमारतीच्या काचा फुटल्या. हॉटेल बंद असतानाही आंदोलकांनी दगडफेक केल्याने बंदला वेगळे वळण लागले.
कोल्हापूर नाका, ढेबेवाडी फाटा, शाहू चौक, दत्त चौक, चावडी चौक, मंगळवार पेठ, कृष्णा नाका, सैदापूर कॅनॉल, विद्यानगर येथील सर्व व्यवहार बुधवारी दिवसभर बंद राहिल्याने नेहमी गजबज असणाऱ्या या परिसरात शुकशुकाट होता. कोल्हापूर नाक्‍यावरुन आंदोलकांनी मोटरसायकल रॅली काढली. शाहू चौक, दत्त चौक, मुख्य बाजारपेठमार्गे, चावडी चौक, मंगळवार पेठ, कृष्णा नाका, कृष्णा पूलमार्गे सैदापूर कॅनॉल, विद्यानगरमधून पुन्हा कॅनॉलमार्गे विजय दिवस चौक, मार्केट यार्डमार्गे भेदा चौक, कोल्हापूर नाका, ढेबेवाडी फाटा ते पुन्हा कोल्हापूर नाका, अशी रॅली काढल्यानंतर कोल्हापूर नाक्‍यावर आणि हॉटेल पंकजसमोरील उड्डाणपुलाच्या सुरूवातीला मोटरसायकलींसह आंदोलकांनी महामार्गावरच ठाण मांडले. परिणामी दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली. तासभर महामार्ग रोखण्याचा आंदोलकांचा निर्धार होता. मात्र, पोलिसांनी त्यांना काहीवेळ आंदोलनास परवानगी देऊन दहा मिनिटांनी आंदोलन थांबविण्यास भाग पाडले. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.
मोटरसायकल रॅलीतील काही आंदोलक भाजी मंडई परिसरात गेले होते. त्यावेळी तेथे जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे काही वेळ मंडईत तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी परिस्थिती हाताळल्याने तणाव निवळला. दरम्यान, कार्वे नाक्‍यावर रस्त्यात टायर जाळल्याचे समजताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रस्त्यातील टायर बाजूला केले. तसेच महामार्गावर गोटे (ता. कराड) हद्दीतही रस्त्यावर टायर टाकून वाहतूक रोखण्याचा प्रयत्न झाला. कराड-चिपळूण मार्गावर वारूंजी फाटा (ता. कराड) येथे दोन्ही बाजूच्या रस्त्यावर टायर पेटविण्यात आले होते. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावरील म्होप्रे ते वारूंजी फाटा या पट्ट्यात सर्व व्यवहार बंद होते. त्यामुळे रस्त्यावर आणि गावोगाव शुकशुकाट होता. पेट्रोल पंप, मेडिकल्स, दवाखाने, या अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेऊन सकल मराठा समाजाला पाठिंबा दर्शविण्यात आला.

चौकट-
सव्वा सहाशे फेऱ्या बंद
9 लाखाचा अर्थिक फटका
बंद दिवशी (बुधवारी) एसटी फेऱ्या बंद ठेवण्याची वरिष्ठ पातळीवरून सूचना होती. त्यानुसार कराड आगारातून एकही बस बाहेर पडली नाही. या आगारातून एसटीच्या रोज 625 फेऱ्या होतात. त्या सर्व रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे कराड आगाराचे सुमारे 9 लाखाचे उत्पन्न बुडाले. एकच दिवसात कराड आगाराला आंदोलनाचा एवढा मोठा अर्थिक फटका बसला. तसेच वडाप व्यावसायिकांनीही वाहने बंद ठेवल्याने नागरीकांना पायपीट करावी लागली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चौकट
त्यांना आंदोलकांची अशी शिक्षा…
ग्रामीण भागातून येणाऱ्या आणि शहरातील शाळा, महाविद्यालयाकडे जाणाऱ्या प्रवाशी आणि विद्यार्थ्यांचे वडापवाल्यांना आणि रिक्षावाल्यांना पैसे घेऊ दिले नाहीत. जिल्हा बंद असताना शहर आणि ग्रामीण भागातील रिक्षा, वडापवाल्यांनी गाड्या सुरू ठेवल्यामुळे आंदोलकांनी त्यांना प्रवाशांचे पैसे घेऊ दिले नाहीत. त्यामुळे प्रवासी आणि विद्यार्थ्यांची चांदी झाली. आंदोलकांच्या या शिक्षेमुळे शहर रिक्षा आणि वडाप बंद ठेवण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)