करमुक्‍त लाभांश जमा करण्याचे दिवस

दोन आठवड्यांपूर्वी सूचवलेले शेअर्स ज्यांनी 5/20 चलत सरासरीवर पॉझिटिव्ह ब्रेक आऊट दिले होते ते होते, टीसीएस, पॉवरग्रीड, कॅडिला व निफ्टी 50. पैकी आजतागायत (19/4) टीसीएसने 240 रुपये वाढ नोंदवलीय (रु. 2950 ते रु. 3190); पॉवरग्रीड कॉर्पोरेशन 12 रुपये (रु. 196 ते रु. 208) वाढलाय तर निफ्टी 50 ने (10331 ते 10565 अशी) 234 अंकांची तेजी नोंदवलीय, तर कॅडिला मात्र 6 रु. खाली बंद झालाय.

कॅडिलानं पुन्हा निगेटिव्ह क्रॉसओव्हर दिल्याने त्यातून बाहेर पडण्यास (स्टॉप लॉस) आपला अभ्यास सूचवत आहे व आधी म्हटल्याप्रमाणं ज्या गोष्टी किंवा अभ्यास आपण शेअर घेण्यासाठी वापरतो त्याच अभ्यासानुसार त्यातून बाहेर देखील पडणं व शिस्त पाळणं हाच यशाचा मूलमंत्र आहे. येत्या आठवड्यासाठी याच अभ्यासानुसार (19/4 च्या बंद भावानुसार) अंबुजा, एसीसी, बजाज-ऑटो, डीएलएफ, गेल, ग्रासिम, आयसीआयसीआय बॅंक, टाटा स्टिल यांच्या शेअर्सनी दैनिक आलेखावर पॉझिटिव्ह ब्रेक (5/20) आऊट दिलेले आहेत.

आतापर्यंतच्या काही लेखांत आपण पाहिलं की टेक्‍निकल अथवा फंडामेंटल ऍनालीसिसच्या मदतीनं आपण योग्य कंपन्यांचे शेअर्स कशा प्रकारे निवडू शकतो व नफा कमावू शकतो. आता, बऱ्याच गुंतवणूकदारांना बाजारातील अस्थिरता आवडत नाही, जसं आम्ही मागील कांही महिन्यांत अनुभवत आहोत; परंतु जर आपणांस शेअर्समध्ये दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करून ठेवायची असेल व छोटे नफे वसूल न करण्यावर जर आपला जास्त भर असेल तर आपल्या पोर्टफोलिओमध्ये लाभांश देणाऱ्या चांगल्या कंपन्यांचे शेअर्स असणं गरजेचं आहे.

जेव्हा बाजारातील परतावा उत्तम असतो, तेव्हा गुंतवणूकदार सामान्यत: लाभांशाकडे लक्ष देत नाहीत कारण प्रथमदर्शी लाभांश दिसताना लहान वाटू शकतात परंतु दीर्घ मुदतीत ते मोठ्या प्रमाणात कमाई करून देतात. एका कंपनीनं केलेल्या अभ्यासानुसार, जर आपण 20 वर्षांपूर्वी लाभांश देणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसे गुंतविले असते आणि मिळालेला लाभांश पुन्हा त्याच शेअर्समध्ये गुंतवला असता तर आपली गुंतवणूक 10 पट वाढली असती. जरी लाभांश बाहेर काढला असता, तरी परतावा 8 पटीपेक्षा जास्त असता.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, बॅंकेच्या मुदत ठेवीवरील व्याज हे करपात्र आहे तर 10 लाख रु. पर्यंत लाभांशावर कर भरावा लागत नाही सेक्‍शन 10(34) प्रस्तावित. म्हणून कर पश्‍चात, हा गुंतवणूक पर्याय अधिक प्रभावी वाटतो. सध्याच्या परिस्थितीत, जेथे मुदत ठेवीचे व्याजदर हे 6 ते 7 टक्के आहेत त्यामुळं तितकाच लाभांश देणाऱ्या काही चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून भांडवल वृद्धी देखील पदरात पाडून घेता येईल. आता बाजारात व्यक्ती तितक्‍या प्रकृती, म्हणूनच प्रत्येकाची जशी राहण्याची स्टाईल तशीच गुंतवणुकीची देखील प्रत्येकाची आपापली स्टाईल असते.

पारंपरिक गुंतवणूकदार लाभांशावर जास्त भर देतो तर जोखीम स्वीकारावयास तयार असलेला नवीन / तरुण गुंतवणूकदार हा कमी कालावधीमध्ये जास्त परतावा देणारे शेअर्स शोधतो; परंतु चढत्या बाजारात, गुंतवणूकदार बाजाराच्या वाढीत आनंदी नसतो तर तो अधिक हॉटस्टॉक शोधत असतो व यात गैर देखील काही नाहीय; परंतु अशांनी काही ढोबळ बाबींचा विचार करणं देखील गरजेचं आहे. अशा गुंतवणूकदारांनी कंपनीच्या व्यवसायाच्या स्थिरतेचं विश्‍लेषण केले पाहिजे – यासाठी उद्योगास चालना, कंपनीची स्थिती आणि भविष्यातील धोरणांसारख्या घटकांचा अभ्यास करणं आवश्‍यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्या कंपनीची लाभांश देण्याकरिता कॅश फ्लो उत्पन्न करण्याची क्षमता – याकरिता पुन्हा नफा, कॅपेक्‍स योजना व लाभांश प्रमाण तपासावयास हवं.

आता पाहू लाभांश (डिव्हिडंड) म्हणजे काय? लाभांश म्हणजे कंपनीनं तिच्या भागधारकांना दिलेला मोबदला. अनेकदा कंपन्या आपल्या झालेल्या नफ्यातून खऱ्या गुंतवणूकदारांना म्हणजेच भागधारकांना काही नफा लाभांशाच्या स्वरूपात वितरित करतात. लाभांश हा नेहमी शेअर्सच्या दर्शनी किमतीवर (Face Value) ठरवला/ दिला जातो व त्याचे लाभांशाचे उत्त्पन्न (Dividend Yield) मोजताना त्याचा बाजारातील भाव विचारात घेतला जातो.
उदा. मागील महिन्यात वेदांता कंपनीनं 2120 % डिव्हिडंड जाहीर केला होता. म्हणजेच कंपनीच्या एका शेअरचं दर्शनी मूल्य आहे 1 रुपया व त्यावर कंपनीनं 21.2 रुपये लाभांश जाहीर केला, जो होता 2120%. आता पाहू याचं लाभांश उत्त्पन्न (Dividend Yield) किती येतं.

जेव्हा कंपनीनं लाभांश जाहीर केला (9 मार्च) तेव्हा या कंपनीच्या शेअरचा भाव होता 304.15 जर आपण 304 या भावात 1 शेअर घेतला असता तर आपणांस 21.2 रुपये लाभांश मिळाला असता म्हणजेच 304 रुपयांच्या गुंतवणुकीवर 21.2 रुपये लाभ (Yield) म्हणजेच साधारणपणे 6.97%. म्हणून गुंतवणूकदारांनी कंपनीचा किती लाभांश आहे हे पाहण्यापेक्षा त्याचं लाभांश उत्त्पन्न (Dividend Yield) किती येतंय याकडे जास्त लक्ष द्यावं.

आता वेदांता कंपनीच्या शेअरनं गुंतवणूकदारांच्या मुदत ठेवीचं काम नक्कीच केलंय. आता येणाऱ्या दिवसांत जर हा शेअर वाढून 400 रु. झाल्यास दुधात साखरच! अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंपन्या लाभांश हा प्रत्येक तिमाहीस (अंतरिम) देऊ शकतात, विशेष लाभांश म्हणून देऊ शकतात व अंतिम (Final) म्हणून देखील देऊ शकतात.
खालील कोष्टकात अशाच काही चांगल्या Dividend Yield असणाऱ्या कंपन्या देत आहे.

टीप – वर उल्लेखलेल्या कंपन्या या 7% पेक्षा अधिक लाभांश उत्त्पन्न (Div Yield) असलेल्या कंपन्या आहेत व हे Div Yield रोजच्या किमतीनुसार बदलू शकतं ही गोष्ट ध्यानात घ्यावी.
आता पाहुयात कोणत्या कंपन्यांनी मागील पांच वर्षांत सरासरी किती लाभांश दिला..

आता या महिन्यापासून कंपन्यांचे शेवटच्या तिमाहीचे व बहुतांशी कंपन्यांचे वार्षिक निकाल येण्यास सुरुवात झाली आहे व त्याचबरोबर भरघोस अंतिम लाभांश देखील जाहीर केला जात आहे / जाईल. तर आता यांकडं वेगळ्या दृष्टिकोनातून पाहुयात. खालील कोष्टकात काही नुकताच लाभांश जाहीर केलेल्या कंपन्यांची यादी देत आहे.

आता येथे इन्फोसिसनं प्रति शेअर रु. 20.50 हा अंतिम लाभांश व रु. 10 प्रति शेअर हा विशेष (स्पेशल) लाभांश जाहीर केलेला आहे व तो पदरात पाडून घेण्याची शेवटची मुदत आहे 14 जून (एक्‍स डेट). आता या संदर्भात दोन संज्ञांमध्ये संभ्रम पाहावयास मिळतो, तो म्हणजे रेकॉर्ड डेट व एक्‍स डेट.

रेकॉर्ड डेट म्हणजे त्या तारखेस ज्या गुंतवणूकदारांच्या नावावर शेअर्स जमा असतात म्हणजेच कंपनीच्या दप्तरी तशी नोंद असते, तेच गुंतवणूकदार हा लाभांश अथवा बोनस मिळण्यास पात्र असतात. एक्‍स डेट म्हणजे, ज्या दिवशी तो लाभांश अथवा बोनस अमलात येतो.एक्‍स डेट ही सर्वसाधारणपणे रेकॉर्ड डेटच्या 1 किंवा 2 दिवस अगोदर असते. एक्‍स डेटच्या आधी 1 दिवस जरी शेअर खरेदी केल्यास तो गुंतवणूकदार हा त्या लाभांशासाठी अथवा बोनससाठी पात्र ठरतो. येथे इन्फोसिसनं 14 जून ही एक्‍स डेट म्हणून जाहीर केलीय.

अस्थिर/पडत्या बाजारात असे उत्तम लाभांश देणारे शेअर्स चांगला परतावा देऊन जातात.अर्थातच लाभांशासाठी लोभात न पडणं हा देखील एक गुण प्रत्येक गुंतवणूकदारामध्ये असणं आवश्‍यक ठरतं, बघा पटतंय का !


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)