करंदीत गॅस पाइपलाइनचे काम पाडले बंद

केंदूर- कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता करंदी (ता. शिरूर) येथे जबरदस्तीने व पोलिसी बळाच्या मदतीने गॅस पाइपलाइनचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, स्थानिक शेतकरी तथा करंदीचे माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक ढोकले यांनी आक्रमक पवित्रा धारण करीत हे काम बंद पाडले आहे.

गेल्या आठ दिवसांपासून महेश गॅस एजन्सी या गॅस पाइपलाइनचे काम करंदी परिसरात सुरू आहे. यापूर्वी केंदूरचे शेतकरी एकत्र येत हे काम बंद केले होते, त्यांनंतर त्याठिकाणचे काम तात्पुरते बंद करून जातेगावच्या दिशेने काम सुरू केले. दरम्यान, जातेगावच्या काही शेतकऱ्यांनी देखील विरोध दर्शविला होता; परंतु त्यावेळी शेतकऱ्यांची मनधरणी करण्यात कंपनीच्या अधिकाऱ्यांना यश आले होते. मात्र, गुरुवारी (दि. 15) करंदी या ठिकाणी अशोक ढोकले यांच्या वडिलोपार्जित असलेल्या जमीनमधून चाकण-शिक्रापूर राज्य महामार्गालागत जाणाऱ्या या पाइपलाइनची कोणतीही कायदेशीर परवानगी नसल्याने कामासाठी त्यांनी विरोध दर्शविला. यावेळी शेजारील शेतकरी देखील आक्रमक होत हे काम बंद करण्याची संबंधित अधिकाऱ्यांना विनंती केली.

दरम्यान, त्याठिकाणी उपस्थित असलेले पोलीस उपनिरीक्षक दिवटे यांनी मध्यस्थी करीत काम बंद न करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर काही शेतकरी आणि कंपनीचे अधिकारी यांच्यात शिक्रापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या दालनात बैठक झाली; परंतु यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडे आमच्या माहितीनुसार कोणतीही शासनाची कायदेशीर परवानगी नसून तरीदेखील हे अधिकारी मुजोरपणे अरेरावीची भाषा करत आम्हाला सार्वजिक बांधकाम विभागाची परवानगी असल्याने स्थानिक शेतकऱ्यांच्या परवानगीची गरज नसून आमचे काम नियमित असल्याने आम्ही काम बंद करू शकत नाही, असे त्यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाने आमची कोणतीही जमीन संपादित केली नसून कुठेही राज्य महामार्गाचे हद्द निश्‍चित केली नसून देखील या कंपनीला या प्रशासनाने परवानगी दिलेली बेकायदेशीर आहे. या बेकायदेशीर कामाला आमची हरकत असल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले. यावेळी सुदर्शन ढोकले, पांडुरंग ढोकले, कैलास ढोकले, बाळासाहेब ढोकले, उत्तम ढोकले, राजाराम ढोकले, योगेश ढोकले, बाळू ढोकले, शरद दरेकर यांसह अनेक शेतकरी उपस्थित होते.

  • आमची कामाला हरकत
    चाकण-शिक्रापूर लागत असलेल्या वडिलोपार्जित जमिनीतून कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही लेखी किंवा तोंडी पूर्वसूचना न देता कोणतीही हद्द निश्‍चित न करता वायूवाहिनी कायद्याची अंमलबजावणी न करता जबरदस्तीने गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन आमच्या शेतजमिनीतून बेकायदेशीर क्रेन आणि मशीनच्या साह्याने गॅस पाइपलाइनचे काम सुरू केले असून आमची या कामाला हरकत आहे तरी या बोगस आणि बेकायदेशीर परवानगीची तसेच बेकायदा कामाच्या पोलीस संरक्षणाची चौकशी करण्यात यावी, अशा प्रकारचा अर्ज शिक्रापूर पोलीस ठाण्यामध्ये सुपूर्द केला आहे. तर शुक्रवारी (दि. 26) तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना देखील असाच अर्ज देणार असल्याचे अशोक ढोकले यांच्यासह शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
  • पत्र दाखवून अधिकार कक्षाच्या बाहेर जाऊन परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी, महामार्गाची हद्द निश्‍चित असताना कोणतीही नोटीस न देता गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन कंपनीचे अधिकारी चुकीच्या पद्धतीने काम सुरू करत आहे.
    – चंदन सोंडेकर, सामाजिक कार्यकर्ते
  • या कामात कोणीही अडथळा करू नये, अन्यथा आम्ही अडथळा करणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल करू.
    – सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक, शिक्रापूर

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.