पुणे – हिमोग्लोबिन, छातीचा एक्सरे, प्लेटलेट काउंट यांसारख्या छोट्या परंतु गरजेच्या तपासण्यांना पेशंटला अनेकदा जास्त पैसे मोजावे लागतात. त्यामुळेच आरोग्य विभागाने खासगी कंपन्यांशी टायअप करत या सर्व चाचण्या स्वस्त दरात उपलब्ध करुन दिल्या आहेत. यामध्ये बहुतांशी रक्त, लघवी, थुंकी यांसारख्या चाचण्या शंभर रुपयांच्या आत उपलब्ध करुन दिल्या आहेत.
पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे नागरिकांना चांगल्या पण माफक दरात आरोग्य सुविधा पुरविण्याच्या हेतुने पालिकेकडून 46 केंद्रांवर तपासणी केंद्र सुरु करण्यात येणार आहे. त्यातील काही केंद्रांवर तपासण्या सुरु देखील झाल्या आहेत. नागरिकांची कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी पालिकेने या सर्व चाचण्यांचे दर हे पालिकेच्या संकेतस्थळावर आरोग्य विभागांतर्गत जाहीर केले आहेत. क्लिनिकल पॅथोलॉजी, बायोकेमिस्ट्री, कल्चर सेंसिटीव्हीटी, सायटोलॉजी, हिस्टोपॅथोलॉजी, रेडिओलॉजी, हेमॅटोलॉजी आदी प्रकरांतर्गत जवळपास अडीच हजार प्रकारच्या सेवा या पालिकेकडून आऊटसोर्स करण्यात आल्या आहेत. यामध्ये हिमोग्लोबीन 10 रुपये, छातीचा एक्सरे 66 रुपये, लघवी 30 रुपये, रक्तातील साखर तपासणे – 30 रुपये असे माफक दर आहेत. दरम्यान याला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर शहरात आणखी काही ठिाकणी अशी तपासणी केंद्र उभी केली जाणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा