कमलनाथ यांच्याशी संबंधित 50 ठिकाणी प्राप्तीकराचे छापे

नवी दिल्ली – मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याशी संबंधित 50 ठिकाणी प्राप्तीकर विभागाने आज पहाटेच्या सुमारास छापे घातले. दिल्ली आणि मध्यप्रदेशातील इंदूर, भोपाळ आणि दिल्लीतील ग्रीन पार्क भागातल्या वेगवेगळ्या ठिकाणांवर हे छापे घालण्यात आले. याठिकाणांची तपासणी दुपारपर्यंत सुरू होती. या ठिकाणांमध्ये कमलनाथ यांचे माजी ओएसडी प्रविण कक्कड, माजी सल्लागार राजेंद्र मिग्लानी , कमलनाथ यांच्या मेव्हण्याची कंपनी मोसर बेयर आणि भाचा राहुल पुरीच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. करचुकवेगिरीच्या आरोपावरून हे छापे घालण्यात आले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. लोकसभा निवडणूका जाहीर झाल्यानंतर कक्कड आणि मिग्लानी या दोघांनीही आपापल्या पदांचे राजीनामे दिलेले आहेत.

प्राप्तीकर विभागाच्या पथकामध्ये सीआरपीएफचे जवानदेखील

कमलनाथ यांच्याशी संबंधितांच्या घरांवर छापे घालण्यासाठी पहाटेच्या सुमारास आलेल्या प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पथकामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. सर्वसाधारणपणे प्राप्तीकर विभागाच्या अशा छाप्यांच्यावेळी स्थानिक पोलिसांची मदत घेतली जाते. मात्र कमलनाथ यांचे माजी विशेष अधिकारी प्रवीण कक्कड यांच्या घरावरील छाप्याच्यावेळी “सीआरपीएफ’चे जवान घराबाहेर देखरेखीसाठी तैनात होते. तर स्थानिक पोलिसांचे पथक घरापासून 200 मीटर अंतरावर तैनात होते, असे काही प्रत्यक्ष साक्षीदारांनी सांगितले. छाप्याची ही संपूर्ण कारवाई प्राप्तीकर विभागाच्या दिल्ली युनिटच्या माध्यमातून पार पाडली गेली. कक्कड यांच्या घराव्यतिरिक्‍त कक्कड यांचे कार्यालय, त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरांसारख्या अन्य 5 ठिकाणीही छापे घातले गेले.

इंदूरमध्ये विजयनगर भागात कक्कर यांच्या घरावर छापा घालण्यासाठी अधिकाऱ्यांचे पथक दिल्लीहून आले होते, असे प्राप्तीकर विभागाच्या सूत्रांनी सांगितले. या ठिकाणची कागदपत्रे जप्त करण्यात आली असून त्याची छाननी केली जात आहे. कक्कड हे मध्यप्रदेशातील माजी पोलिस अधिकारी असून मध्यप्रदेशात गेल्या वर्षी कॉंग्रेस सरकार सत्तेवर आल्यावर त्यांची कमलनाथ यांचे ओएसडी म्हणून नियुक्‍ती करण्यात आली होती. “युपीए’सरकारच्या काळात माजी केंद्रीय मंत्री कांतिलाल भुरिया यांचे ओएसडी म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. कक्कड यांचे कुटुंबीय हॉस्पिटॅलिटीसह इतर अनेक व्यवसायांशी संबंधित आहेत.

कोलकातास्थित पारसमल लोढा यांच्याशी संबंधित काही ठिकाणीही छापे घालण्यात येत आहेत. पहाटे 3 च्या सुमारास प्राप्तीकर विभागाच्या सुमारे 200 अधिकाऱ्याच्या पथकाने हे छापे घातले आणि काही रोख रक्कमही ताब्यात घेतली आहे. राहुल पुरी यांची गेल्या आठवड्यात ऑगस्टावेस्टलॅन्ड हेलिकॉप्टर खरेदी गैरव्यवहार प्रकरणी सक्‍तवसुली संचलनालयाने दिल्लीमध्ये चौकशीही केली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.