कपातीची मुदत संपली;नियमित पाणीपुरवठा होणार का?

  • शहरात 25 नोव्हेंबर 2019 पासून दोन महिन्यांसाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा लागू

पिंपरी – पवना धरणात 100 टक्के पाणीसाठा असूनही समन्यायी पाणी वाटपाचे कारण देत पिंपरी-चिंचवड महापालिकेने 25 नोव्हेंबर 2019 पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला. ही पाणी कपात दोन महिन्यासाठी करण्यात येत असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते, त्याची मुदत शनिवारी संपत आहे. त्यामुळे एक दिवसाआड पाणी कपात मागे घेऊन दररोज पाणीपुरवठा केला जाणार का? याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

2019च्या पावसाळ्यात उच्चांकी पाऊस झाला होता. नोव्हेंबर अखेरपर्यंत सुरु असलेल्या पावसाने पहिल्यांदाच शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण नोव्हेंबरपर्यंत शंभर टक्‍के भरले होते.त्यामुळे पवना धरण तीनवेळा 100 टक्के भरले होते. धरणात पाणी असूनही नागरिकांना पाणी मिळत नव्हते. पाण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली होती. शहराच्या अनेक भागात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे धरणात 100 टक्के पाणीसाठा असतानाही पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनाअभावी शहरवासीयांना हिवाळ्यातच पाणी कपातीचा सामना करावा लागला.

महापालिकेने 25 नोव्हेंबर 2019 पासून एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला होता. पालिकेच्या या निर्णयावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्‍त केला होता. पाण्याची टंचाई नसून समन्यायी पाणी वाटपासाठी एकदिवसाआड पाणीपुरवठा केला आहे. दोन महिन्यांसाठीच एकदिवसाआड पाणीपुरवठा केल्याचे प्रशासनाने सांगितले होते. दरम्यानच्या काळात शहरातील पाणीपुवठा करणाऱ्या यंत्रणेमध्ये दुरुस्ती केली जाणार होती. तसेच अनधिकृत नळजोड, मोटारी जप्त करुन सुसूत्रता आणणार असल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाने केला होता.

एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु असल्याने पाण्याच्या तक्रारींचे प्रमाण कमी झाले असल्याचा दावा प्रशासन करत आहे. परंतु, धरणात जुलै 2020 पर्यंत पुरेल एवढा मुबलक पाणीसाठा असतानाही शहरवासीयांना एक दिवसाआड पाणी मिळत आहे. शहराच्या अनेक भागातून नागरिकांच्या याबाबत संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अनेक भागांमध्ये मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा होत नाही. जलशुद्धीकरण केंद्रापासून जवळ असलेल्या भागांमध्ये पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होतो. तर केंद्रापासून लांब असलेल्या भागामध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. तसेच अनेक नागरिकांकडे साठवण क्षमता नाही. त्यामुळे एक दिवसाआड पाणी येत असल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. एक दिवसाआड पाणीकपातीची दोन महिन्याची मुदत आज संपत असून पाणी कपात मागे घेऊन दररोज पाणीपुरवठा केला जाणार का याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

हाताची घडी तोंडावर बोट
शहरात पाणी कपात सुरु झाल्यानंतर नागरिकांसह विविध राजकीय पक्षांच्या वतीने टाहो फोडण्यात आला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने महापालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात आला. तर मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी टाकीवर चढत शोले स्टाईल आंदोलन केले. अनेक हौसिंग सोसायटींनीही आंदोलने केली. मात्र महापालिकेमध्ये सत्ता असलेले भाजपचे पदाधिकारी निवांत राहिले. एक दिवसाआड पाणीपुरवठा केल्यानंतर शहरातील पाणीपुरवठा कसा सुरळीत होणार आहे, याचा निर्वाळा भाजपचे पदाधिकारी करत राहिले. त्यामुळे प्रशासनालाही सत्ताधारी भाजपची साथ मिळाली. त्याचप्रमाणे विरोधकांनीही पालिकेत मूक सहमती आणि बाहेर विरोध प्रदर्शन असे दुटप्पी धोरण राबविले होते. आता दोन महिन्यांची दिलेली मुदत संपली आहे. आता तरी भाजप पाणीकपातीवर बोलणार का हा प्रश्‍न आहे. तसेच विरोधक आता तरी जनतेच्या हितासाठी आक्रमक पवित्रा घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दोन महिन्यासाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला होता. एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केल्याने तक्रारींचे प्रमाण कमी झाले. नागरिकांना जादा दाबाने पाणी दिले जात आहे. दोन महिन्याची मुदत शनिवारी संपत आहे. याबाबत आयुक्तांसोबत बैठक होईल. दोन महिन्यातील आढावा घेतला जाईल. किती तक्रारी आल्या, कोणत्या भागातून आल्या याची सविस्तर माहिती आयुक्तांना दिली जाईल. त्यानंतर एकदिवसाआड पाणीपुरवठा कायम ठेवायचा की दररोज पाणीपुरवठा करायचा याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.
– मकरंद निकम, सहशहर अभियंता, पाणपुरवठा विभाग

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here