वाघीरे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून स्वच्छता मोहीम
ओतूर- येथे श्रावणी तिसऱ्या सोमवारी (दि. 19) कपर्दिकेश्वराची यात्रा उत्साहात पार पडली. यानंतर मंदिर परिसरात झालेल्या कचऱ्याची पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संचलित अण्णासाहेब वाघीरे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम राबवून चार ट्रॉली कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली असल्याचे सुशील जाधव यांनी सांगितले.
ओतूर (ता. जुन्नर) येथे तिस-या श्रावणी सोमवारी कपर्दिकेश्वराच्या यात्रेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखाहून अधिक भाविक दर्शनासाठी आले होते. मोठी यात्रा भरली असल्याने मंदिर आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा झाला होता. याठिकाणी अण्णासाहेब वाघीरे महाविद्यालयाच्या एनएनएस आणि एनसीसीच्या साडेतीनशे विद्यार्थ्यांकडून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
याकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. एन. साळवे आणि उपप्राचार्य डॉ. जी. एम. डुंबरे यांनी मार्गदर्शन केले. एनसीसी प्रमुख डॉ. नीलेश हांडे, डॉ.अमोल बिबवे, डॉ. शितल कल्हापुरे, डॉ. नीलेश काळे, डॉ.विनायक कुंडलिक, डॉ. अजय केवाडे, डॉ. भूषण वायकर आणि विद्यार्थ्यांनी यासाठी परिश्रम घेतले. ओतूरचे सरपंच संतोष तांबे यांनी ग्रामपंचायतचे दोन ट्रॅक्टर आणि कर्मचारी या स्वच्छता मोहिमेकरिता पुरवून सहकार्य केले.