कधी ऐकलीय का अशी चोरी….

ओएलएक्‍सवर स्वत:ची दुचाकी विकून स्वत:च करायचा चोरी
पुणे,दि.7

ओएलएक्‍स या ऑनलाईन संकेतस्थळावर दुचाकीची विक्री करून परत त्याच गाडीची चोरी करणाऱ्याला येरवडा पोलिसांनी जेरबंद केले आहे. आरोपी हा गाडी चोरी करण्यात अतिशय पटाईत असून, ज्याला गाडी विक्री केली आहे. त्याची तो सुरूवातीला माहिती घेत असे. त्यानंतर बनावट चावीने गाडी चोरी करून फरार होत होता.
दर्शन जयकुमार अग्रवाल (वय 34, रा. मुळ काळाराम मंदीर, नाशिक) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी राहूल नथुजी कुमेरिया यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहूल एका खासगी कंपनीत नोकरीला असून त्यांना सेकेंड हॅण्ड दुचाकी खरेदी करावयाची होती. त्यासाठी 15 नोव्हेंबरला त्यांनी ओएलएक्‍स वेबसाईटवर दुचाकीची माहिती सर्च करुन आरोपी दर्शनशी संपर्क साधला. प्राथमिक बोलनी झाल्यावर त्यांनी ऑनलाईन व्यवहार करीत मोपेड दुचाकी खरेदी केली. मात्र अवघ्या तीन दिवसांतच पार्किंगमधून त्यांची दुचाकी चोरी झाली.
येरवडा पोलिस तपास करीत असताना ऑनलाईन व्यवहार करुन दुचाकीची विक्री करणाराच चोरटा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दर्शनला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्‍या दाखवला. यावेळी त्याने येरवड्यातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तसेच त्याने कमी किंमतीत दुचाकी विक्री करण्याच्या बहाण्याने विमाननगर आणि वाघोली येथील दोघांकडून ऑनलाईन पैसे घेऊन फसवणूक केल्याचे देखील सांगितले.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यूनूस शेख, पोलीस निरीक्षक गुन्हे अजय वाघमारे, सहायक निरीक्षक बलभिम ननवरे,कर्मचारी बाळासाहेब बहिरट, हणमंत जाधव, पंकज मुसळे यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.