#कथाबोध: संपत्ती आणि विपत्ती 

डॉ. न. म. जोशी 
भोज राजाच्या दरबारात, त्याचे कारभारी दरबारी तर होतेच. पण अनेक विद्वान, कवी, संगीतकार ही होते. भोज राजा नेहमीच विद्वानांचा सन्मान करत असे. अनेकदा एक विद्वान, व्रतस्थ पंडित भोज राजाच्या भेटीसाठी येत असत. प्रत्येक विद्वानाने काही तरी वेगळा बोध घ्यावा, असं राजाला वाटत असे. मुद्दाम मग सहजासहजी राजाची भेट घेणं विद्वान लोक टाळत असत, प्रत्येक वेळी वेगळा बोध काय देणार?
पण हे एक नवेच विद्वान पंडीत भोज राजाकडे गेले.
महालाबाहेरच्या पहारेकऱ्यानं विचारलं, “कोण आलेत म्हणून सांगू?’
“सांगा; राजाला म्हणावं तुमचा भाऊ आलाय.’
हा निरोप ऐकून राजा आश्‍चर्यचकित झाला; कारण राजाला कुणी भाऊ नव्हताच. तरीही त्या विद्वान पंडिताला भेटावं, असं राजाला वाटलं. राजानं संमती दिली. विद्वान पंडित दरबारात गेले. ते अगदी साध्या वेषात होते. काही ठिकाणी त्यांची वस्त्रे जीर्ण झालेली वाटत होती. चेहरा मात्र तेजःपुंज होता. डोळेही चमकदार, पाणीदार होते.
“या पंडित स्वागत! आम्हाला सांगा तुम्ही आमचे भाऊ कसे?’
“सांगतो राजेश्‍वरा, तुमचा मावस भाऊ आहे.’
“मावस भाऊ! मला तर कुणी मावस भाऊ नाही.’
“आहे. तुम्हाला मावशी आहे.’
‘कुठे आहे?’ सांगा बरं राजानं उत्सुकतेनं विचारलं.
‘राजेश्‍वर भोज, आपण राजा आहात. धनवान आहात. आपण संपत्तीचे पुत्र आहात.’
‘ठीक पण मग मावशीचं काय?’
‘सांगतो, मी पंडित असलो तरी मी विपत्तीत आहे. मी विपत्तीपुत्र आहे. संपत्ती आणि विपत्ती या बहिणी आहेत. तुम्ही संपत्तीपुत्र? मी विपत्तीपुत्र आहे. म्हणजेच मी तुमचा मावसभाऊच ना!’
पंडिताच्या या उत्तरावर राजा खूष झाला. राजानं पंडिताला मोहोरांचं ताट भेट दिलं.
“मग राजानं विचारलं – पण मग मावशी कुठ आहे? तुमची आई?’
“राजा, तुम्ही मला संपत्ती दिलीत, त्याचक्षणी माझी आई- विपत्ती ही स्वर्गवासी झाली.’
पंडिताच्या या उत्तरानंही राजा अजूनच खुष झाला. त्यानं पंडिताला सरकार दरबारी ठेऊन घेतलं.
कथाबोध 
संपत्ती आणि विपत्ती या दोघी बहिणीच असतात. संपत्ती येते तेव्हा विपत्ती नाहीशी होते आणि विपत्ती येते तेव्हा संपत्ती नाहीशी होते. हे जुळ्या बहिणीचं भांडण आहे. तो त्यांचा स्वभाव आहे. म्हणून माणसानं संपत्ती अथवा विपत्ती या दोघींनाही समान मानून आपला जीवन व्यवहार सुरू ठेवावा.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)