#कथाबोध: श्रमाचे महत्व… 

डॉ. न. म. जोशी 
चिनी तत्वज्ञ कन्फ्यूशिअस यांचा एक शिष्य विश्‍वभ्रमणासाठी निघाला होता. तो तैवानमध्ये पोहचला. एका गावाबाहेर हिरव्यागार वनराईने नटलेल्या बागेत एक माणूस झऱ्यातलं पाणी कळशीत भरून झाडांना घालत होता, हे त्यांनी पाहिलं. प्रौढ वयाचा तो माणूस थकलेला वाटत होता. पण चेहरा मात्र तजेलदार होता. त्याचे श्रम पाहून शिष्याला कणव आली. त्याचे श्रम कमी व्हावेत म्हणून शिष्याने एक योजना केली. झऱ्याच पाणी झाडांना नेऊन घालण्याऐवजी त्याने त्या झऱ्याला एक पाट काढला आणि त्या पाटांचं पाणी झाडांना आपोआप मिळेल अशी व्यवस्था केली. तो श्रमिक शेजारीच एका झोपडीत राहत होता.
शिष्य त्याला म्हणाला,
“तुझे कष्ट बघून मला दया आली म्हणून मी ही योजना केली आहे.
“आभारी आहे मी तुमचा. मलाही आता कष्टातून थोडी सुटका हवी होती.’
‘होय, आता तुला चांगली विश्रांती मिळेल, सुखानं राहा.’
‘होय महाराज, तुमचे फार उपकार आहेत. तुम्ही ही योजना करून दिलीत.’
‘लोकांना मदत करणे हे माझं कामच आहे.’
‘आपण महात्मा आहात.’
‘मी महात्मा नाही आमचे गुरू कन्फ्यूशिअस महात्मा आहेत. त्यांची ही शिकवण…’
‘त्यांना माझा नमस्कार सांगा. आणि आपण नेहमी येथे येत जा.’
‘येईन, मी आता जगप्रवासाला निघालो आहे. येताना परत येईन.’
‘मी वाट पाहिन,’ श्रमिक म्हणाला.
एक दीड वर्षानंतर काही कारणामुळे आपला जगप्रवास अर्धवट सोडून शिष्य पुन्हा चीनला जाण्यासाठी निघाला. वाटेत तैवानला जाऊन त्या श्रमिकाची भेट घ्यावी असं त्याला वाटलं. तो उत्सुकतेने तैवानमधल्या त्या गावी त्याच वनराईत गेला. त्यानं काय पाहिलं. झोपडीत तो श्रमिक अस्ताव्यस्त पहुडला होता. त्याच्या चेहऱ्यावरची रया गेली होती. शिष्यानं त्याच्या पत्नीला विचारलं “याची ही अवस्था का झाली? पूर्वी किती छान होते.’
‘कुण्या महात्म्याने यांना श्रम कमी करण्यासाठी झऱ्याला पाय काढून दिले. तेव्हापासून हे आळशी बनले. आता तर त्यांच्या शरीरात पुरता आळस भरलाय. श्रमांची टवटवी गेली आणि आळसाच्या आठ्यांनी शरीर भरलं. कोण तो महात्मा?’
पत्नी कुजबुजली. शिष्यानं दिलेल्या सोयीचा योग्य असा उपयोग न करता श्रमिक आळशी बनला. म्हणून त्याची अशी दुरवस्था झाली.
कथाबोध 
तंत्रज्ञान किती पुढे गेलं तरी शरीरश्रमांना माणसानं कमी लेखू नये. कारण शरीरश्रम शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी उपयोगी असतात. शरीरात आळस वाढून देता कामा नये. आळस हा माणसाचा शत्रू आहे, हे नेहमी ध्यानात ठेवलं पाहिजे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)