#कथाबोध: शाळा न शिकलेला सुशिक्षित

डॉ. न. म. जोशी

सांगली जिल्ह्यातलं वाटेगाव नावाचं गाव. वाटेगावचा वासुदेव प्रसिद्ध आहे. पण वाटेगावचा एक तुकाराम हा पुढे खूप ख्यातनाम झाला. तुकाराम एका गरीब कुटुंबात जन्माला आला. त्याला शाळेत घातलं. पण पहिल्याच दिवशी त्यानं शाळा सोडली. एकच दिवस शाळेचं तोंड पाहिलं. शाळेत बस्करावर बसून पुस्तक वाचण्यापेक्षा निसर्गाचं पुस्तकं वाचणं तुकारामाला आवडू लागलं. वारणेच्या खोऱ्यात हिंडावं, रानोमाळ भटकावं ओढ्यात डुंबावं, झऱ्याशी खेळावं, कधी गुरं राखावीत यामध्ये तुकाराम अधिक रममाण होत होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पण गावात आता कुटुंबाचं भागेना. त्याचं सारंच कुटुंब भाकरीच्या शोधात मुंबईला निघालं. मुंबईच्या प्रवासाचं पैसेही या कुटुंबाला वाटेत मोलमजुरी करून मिळवावे लागले. मुंबईत एका जवळच्या नातेवाईकाचा तात्पुरता आधार होता. तुकाराम मुंबईत डोक्‍यावर कपड्यांची ट्रंक घेऊन कपडे विकू लागला. रस्त्यानं जाताना तो दुकानांच्या पाट्या वाचत असे. मूळची थोडी अक्षर ओळख होती. पण दुकांनाच्या पाट्या वाचता वाचता तो अधिक वाचायला शिकला. तुकाराम थोडा मोठा झाला. तो लिहू लागला, तो गातही होता. मुंबईला गिरणी कामगारांची चळवळ मोठ्या प्रमाणात फोफावली होती. लाल बावटा गट त्यावेळी कामगारांसाठी काम करीत होता. त्यांचं कलापथक होतं. शाहिरी फड होता. तुकाराम या शाहिरी फडात सामील झाला. त्याच्या लावण्या आणि पोवाडे यांना दाद मिळू लागली.

आता तुकाराम आणखी काही लिहू लागला. गावाकडची माती त्याला खुणावत होती. त्याने गोष्टी लिहिल्या. कादंबऱ्या लिहिल्या. “माकडीचा माळ’, “चंदनवाडी’, “फकीरा…’ एकाहून एक सरस कथा आणि कादंबऱ्या लोक आवडीनं वाचू लागले.

मग तुकारामाला रशियाला जायची संधी मिळाली. त्यावेळी त्याने आयुष्यात प्रथमच सूट परिधान केला. वाटेगावचा तुकाराम रशियात मॉस्कोला पोचला. शाळाही न शिकलेला हा सुशिक्षित कोण होता?
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे!
कथाबोध

प्रज्ञावंताला जात नसते. प्रज्ञावंताला वय नसतं. प्रज्ञावंताला स्थळ-काळाचं बंधनही नसतं. एकच दिवस शाळेचं तोंड पाहिलेले अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य शाळा शिकलेल्यांनाही अचंबित करणारं होतं. औपचारिक शिक्षणापेक्षा स्वप्रयत्नाने अनौपचारिक शिक्षणासाठी माणसाला सुशिक्षित होता येतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)