#कथाबोध: वादळ आणि झुळुक 

डॉ. न. म. जोशी 
वादळ आणि झुळुक दोन्हीही वाऱ्याचीच मुलं. वादळभाऊ फार शक्तीशाली होता. झुळुकबाई तशी नाजूक होती. वादळ आपल्या या बहिणीला, झुळुकबाईला, नेहमीच चिडवायचा. “ए हळुबाई जरा लवकर लवकर चल. मी बघ कसा झपाझप चालतो.’
वादळभाऊनं चिडवलं की झुळुकबाईला थोडं वाईट वाटायचं- दोघांचा याबाबतीत नेहमीच संवाद व्हायचा. वादळभाऊ म्हणाला, “हे बघ झुळुकताई, मी आलो की माझ्या येण्याची वर्दी मोठमोठे हवामानतज्ज्ञ लोकांना आधीच देतात.’
“माहीत आहे तुझा पराक्रम…’ झुळुकताई गालात हसून म्हणाली.
“अगं मी असा दमदार चालतो की माझ्यापुढे मोठमोठे वृक्षसुद्धा भुईसपाट होतात. लोक आपली दारं-खिडक्‍या बंद करून घेतात. पृथ्वीवरची धूळ सगळीकडं उडू लागते. घरावरचे पत्र धाड्‌धाड्‌ वाजू लागतात आणि लोक गुपचूप घरात बसून राहतात.’
“हो रे होय. पण हा काय तुला तुझा पराक्रम वाटतो?’
“का नाही वाटणार?’
“तो कसा काय?’
“तुझं स्वागत करण्याऐवजी लोक दारं-खिडक्‍या बंद करून घरात बसतात. म्हणजेच तुझ्या स्वागताला कुणीही नसते. तुझ्या येण्यानं लोकांना आनंदाऐवजी
दुःखच होते.’
“पण मग तुझं तरी काय? तुला तरी कोण विचारतो?’ वादळभाऊ म्हणाला.
“अरे मी आले की लोकांना परमानंद होतो. झाडांची पानं डहाळ्या टाळ्या वाजवून माझं स्वागत करतात. पक्षी आपल्या घरट्यांतून बाहेर येतात. पंख फडकावीत आभाळात उडतात. वेलीवरच्या फुलांशी मी खेळते तेव्हा मंद सुगंध सगळीकडे पसरतो आणि वातावरण प्रसन्न होते. उन्हाळ्याच्या दिवसात तर माझ्या येण्याची लोक आतुरतेनं वाट बघत असतात. माझ्या स्वागतासाठी लोक बंद दारं-खिडक्‍या उघडतात, आणि मी आले की प्रसन्नतेनं माझं स्वागत करतात. आणखी एकच मोठी गोष्ट सांगू? मी केव्हा येते याची लोक वाट बघतात. आणि तू केव्हा जाशील याची वाट बघतात.’
यावर वादळभाऊ निरुत्तर झाला नसेल तरच नवल!
कथाबोध
कोणतीही शक्ती मानवी जीवनात उत्पात घडवून आणत असेल तर माणसांना त्या शक्तीचा तिटकारा येतो. त्या शक्तीचं सहचर्य नको वाटतं. त्याच शक्तीचं मंद आणि सुखकर रूप माणसाला हवंहवंसं वाटतं. आगीचा लोळ नको वाटतो. दिव्याची ज्योत हवी वाटते.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)