#कथाबोध : तपस्वी आणि बहुरूपी 

डॉ. न. म. जोशी 

एक होता राजा. राजा कलाप्रेमी आणि उदार होता. त्याच्या दरबारी येणाऱ्या कोणाही विद्वानाचा, कलावंताचा राजा सत्कार करीत असे. त्याबद्दल त्याची ख्याती होती. एकदा एक बहुरुपी दरबारी आला आणि म्हणाला, “राजन मी एक बहुरूपी आहे. मला पाच सुवर्णमुद्रा दान द्या.’

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“माझ्या दरबारी मी केवळ दान देत नाही. तू बहुरूपी आहेस, तर तुझी कला दाखव. कला पसंत पडली तर तुझ्या कलेची कदर म्हणून तुला मानधन देईन,’ असं म्हणून राजानं त्याला दान देण्यास नकार दिला.
“महाराज, मला दोन दिवसांची मुदत द्या. मी माझी कला दाखवतो.’ बहुरुपी म्हणाला. मग राजानं त्याला दोन दिवसांची मुदत दिली. बहुरुपी गेला.

दुसऱ्याच दिवशी नगराबाहेर जे उपवन होतं त्याच्या कडेला एका झाडाखाली एक तपस्वी ध्यानस्थ बसलेला गुराख्यांना दिसला. आतापर्यंत हा तपस्वी कधी तिथं दिसला नव्हता. गुराख्यानं प्रणाम करून त्या तपस्व्याला काही फळं देऊ केली. पण तपस्व्यानं आपले डोळेही उघडले नाहीत. गुराख्यानं ही वार्ता काही नगरजनांना सांगितली. मग काही नगरजन उंची वस्त्र आणि फलाहार घेऊन तपस्व्याकडं गेले. तपस्व्यानं डोळे उघडले. पण त्यानं भेटींचा स्वीकार केला नाही. केवळ हाताचा तळवा उंचावून नगरजनांना आशीर्वाद दिला. तपस्व्याच्या निःस्पृहपणाची वार्ता राजापर्यंत पोचली. मग राजा स्वतः लवाजम्यासह 500 सुवर्णमुद्रा भरलेली थैली घेऊन तपस्व्याच्या भेटीला गेला. तपस्वी शांत होते. त्यांनी मौन सोडलं नाही. भेटींचा स्वीकार केला नाही. राजा परत गेला. दोन दिवसांनंतर बहुरुपी राज्याच्या दरबारी आला आणि म्हणाला,

“महाराज, माझी कला मी सादर केली आहे. आता मला पाच सुवर्णमुद्रा द्या.’
“तुझी कला तू कुठे, कशी सादर केलीस?”राजानं आश्‍चर्यानं विचारलं.
“महाराज, तो तपस्वी म्हणजे मीच. आपणच माझ्या भेटीसाठी आला होता.’
“अरे मूर्खा, मग त्या 500 सुवर्णमुद्रा तू का घेतल्या नाहीस?’ राजाने विचारलं.
“महाराज, मी मूळचा तपस्वी नाही. मी बहुरुपी आहे. ते सोंग होतं. सोंगाचा मोबदला पाच मुद्रा. म्हणून मी 500 मुद्रा घेतल्या नाहीत.’

बहुरुप्याचा प्रामाणिकपणा पाहिल्यावर राजानं त्याला त्याच्या कलेचा मोबदला म्हणून पाच सुवर्णमुद्रा दिल्याच पण प्रामामिकपणाचं बक्षीस म्हणून उरलेल्या 495 सुवर्णमुद्राही त्याला बक्षीस देऊन टाकल्या.

कथाबोध 
प्रामाणिकपणा आणि निःस्पृहता हे माणसाचे खरे अलंकार आहेत. ते परिधान केले की वैभव मिळवो अथवा न मिळो, माणसाला श्रीमंती प्राप्त होतेच. ती गुणसंपत्ती असते आणि गुणी लोक या गुणांचं चीज करतात. म्हणूनच नेहमी स्वत:शी प्रामाणिक रहाण्याची सवय लावून घ्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)