#कथाबोध: तपश्‍चर्येची किंमत 

डॉ. न. म. जोशी 
जगप्रसिद्ध चित्रकार पाब्लो पिकासो यांची अनेक चित्रे जगभर गाजली. त्यांच्या चित्रांना उत्तर काळात चांगली किंमतही मिळू लागली. पण पिकासो यांनी आपली चित्रशैली विकसित करण्यासाठी वर्षानुवर्षे अपरंपार कष्ट सोसले होते. एकदा रस्त्यातून पिकासो जात असताना एक परिचित महिला त्यांना भेटली. तिने पिकासो यांना आदरपूर्वक नमस्कार केला आणि ती म्हणाली, “आपण महान चित्रकार आहात. मलाही तुमच्यासारखी चित्रं काढायची आहेत. मला तुमचं एखादं चित्र हवं आहे. ते मी संग्रही ठेवीन. आपण मला चित्रकला शिकवाल?’ “बघू. पुन्हा केव्हातरी भेटा. चित्रकला हा विषय इतका सोपा नाही.’ “पण तुम्ही तर चित्रं अगदी सहजपणे काढता? मलासुद्धा तुम्ही शिकवलंत तर तुमच्यासारखी सहजपणे चित्रं मलाही काढता येतील.’
ती स्त्री तेव्हा निघून गेली. पण पुन्हा एकदा त्यांच्या स्टुडिओतच आली. ती काही पिकासो यांचा पिच्छा सोडेना. त्या स्त्रीला केवळ हौसेखातर चित्रकला शिकायची होती. त्यासाठी आपला अमूल्य वेळ द्यावा असं पिकासो यांना वाटत नव्हतं. कारण पिकासो संकोची होते. मग त्या हौशी स्त्रीला वाटेला लावण्यासाठी पिकासो यांनी एक वेगळा उपाय शोधून काढला. ती पुन्हा आली तेव्हा त्यांनी तिच्यासमोरच एका कागदावर चार-दोन रंगरेषा ओढून एक चित्र काढलं आणि तिला दिलं. ते म्हणाले…
“तुम्हाला माझं चित्र हवंय ना. हे घ्या. चित्रकला शिकण्याचं नंतर बघू. हे चित्रही खूप किमती आहे.’
ती स्त्री चित्र घेऊन गेली. तिच्या दिवाणखान्यात ते चित्र लावलं. एके दिवशी अनेक व्यापारी त्या स्त्रीकडे आले होते. त्यांनी शंभर डॉलर्स देऊन ते चित्र तिच्याकडून विकत घेतलं. मग ती स्त्री पुन्हा पिकासो यांच्याकडं गेली म्हणाली, “खरंच तुम्ही थोर चित्रकार आहे. त्या दिवशी चार दोन रेषा ओढून तुम्ही मला ते चित्र दिलंत; पण ते चित्र एका व्यापाऱ्यानं 100 डॉलर देऊन आग्रहानं विकत घेतलं.’ “बरं झालं. तुम्हाला 100 डॉलर मिळाले ना! या आता.’ “मला चित्र काढायला शिकवा ना. म्हणजे तुमच्यासारखेच पाच मिनिटात चित्र काढून मी शंभर डॉलर मिळवीन.’ पिकासो शांतपणे त्या स्त्रीला म्हणाले, “पाच मिनिटांच्या चित्राला शंभर डॉलर मूल्य येण्यासाठी मला 50 वर्षे तपश्‍चर्या करावी लागली आहे. हे तपश्‍चर्येचं मूल्य आहे. ती स्त्री ओशाळली.
कथाबोध 
कलेची किंमत वेळ, पैसा, मोबदला किंवा अन्य कोणत्याही साधनांनी करता येत नाही. कलावंतांची वर्षानुवर्षांची निरपेक्ष तपश्‍चर्या त्याच्या कलेला उदात्त श्रीमंती बहाल करीत असते. म्हणून कोणत्याही सृजनशील क्षेत्रात तपसाधनेला मोठे महत्त्व असते. 
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)