कथाबोध: उद्यान आणि अरण्य 

डॉ. न.म.जोशी 
परदेशातली गोष्ट आहे जर्मनीतली. विलहॅम नावाचा एक खोडकर आणि खट्याळ मुलगा. शाळेत जायचा कंटाळा त्याला. आई रोज त्याला बळेबळे शाळेत पोहोचवायची. शाळेतसुद्धा याचं फारसं लक्ष नसायचं. आई म्हणायची. “”अरे बाळा शाळेचा कंटाळा करू नको. तुझं पुढं कसं व्हायचं? मला चिंता वाटते.”
एक दिवस शाळेतून परतत असताना विलहॅमने एका मोठ्या रस्त्याच्या कडेला काही मुलं खेळताना पाहिली. ती झोपडपट्टीतली मुलं होती. बहुधा ती मुलं शाळेत न जाणारी होती. पोरं आपल्या मस्तीत खेळत होती. ओरडत होती.
विलहॅमनं आईला विचारलं.
“”आई ही मुलं बघ. ही मुलं शाळेत जातात का?”
“”नाही जात. पण तू का विचारतोस?”
“”ही मुलं शाळेत न जाताच मोठी होताहेत. चांगली खेळत आहेत. मग मलाच तू शाळेचा आग्रह का करतेस? मलाही
त्यांच्यासारखं खेळू दे ना.”
“”आईनं त्याचे हे उद्‌गार मनात ठेवले. मग एक दिवस आई त्याला परगावी मावशीकडे घेऊन गेली. जाताना एक घनदाट अरण्य लागलं. तिथली झाडंझुडपं कशीही वाढलेली होती. काही झाडं मेली होती काही तरारली होती. त्यांचे आकारही वेडेवाकडे होते. काही ठिकाणी रान माजलं होतं. तिथून जाताना पायाला काटे लागत होते.
“”आई, किती गं त्रास आहे?” विलहॅम म्हणाला.
मग आई आणि विलहॅम मावशीच्या गावी आले. तिथं संध्याकाळी एका उद्यानात फिरायला गेले होते. तिथं ओळीनं झाडे लावलेली होती. मधून गवताळ पायवाट होती. एकेठिकाणी गुलाबाचा ताटवा होता. एक माळी त्या ताटव्याला पाणी घालत होता. गुलाबाच्या झाडांवर सुंदर टपोरी गेंददार फुलं आली होती. सगळी बागच सुंदर दिसत होती.
विलहॅम खूश झाला. तो आईला म्हणाला….
“”आई किती सुंदर बाग आहे? फुलं तर किती छान आहेत.”
“”आहेत ना? आवडली का तुला बाग? काल आपण येताना एका अरण्याच्या वाटेनं आलो काटे बोचले. आज उद्यानात आलो आहे. या उद्यानात बागेची झाडांची निगराणी केली जाते. अरण्यात झाडं नुसतीच वाढतात. इथं त्यांना वाढविण्यात येतं. तेव्हा ती सुंदर दिसतात. शाळा म्हणजे उद्यान आहे रे बाबा.”
विलहॅम समजायचं ते समजला. तेव्हापासून तो शाळेत आनंदानं जाऊ लागला.”
जीवनाचं रोपटं उत्तम वाढायचं असेल तर त्याला शिक्षणाची शाळाच हवी. तिथं झाडांना रोपट्यांना संस्काराचं खतपाणी घालून वाढवलं जातं. तेव्हा त्याला सुंदर फुलं फुलं येतात. शिक्षण नसेल, शाळा नसेल तर जीवनाचं रान माजेल.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)