कडक उन्हातही उत्स्फूर्त मतदान

मावळ लोकसभा मतदार संघात 58.21 टक्के मतदान


उरणला सर्वाधिक 61.80 तर पिंपरीत सर्वात कमी 56.30 टक्के मतदान

पिंपरी – तापमान नवे उच्चांक स्थापित करत असताना प्रचंड उकाड्यातही मावळ लोकसभा मतदार संघाच्या मतदारांनी आपले कर्तव्य बजावले. मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी शहरात अतिशय उत्साही वातावरणात मतदान पार पडले. किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत पार पडले. सकाळी सातपासून मतदानाला सुरवात झाली. रात्री नऊ वाजेपर्यंत हाती आलेल्या वृत्तानुसार मावळसाठी 58.21 टक्के मतदान झाले होते.

मावळ लोकसभा मतदारसंघातंर्गत उरण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 61.80 टक्के तर, पिंपरी विधानसभा मतदार संघात सर्वात कमी 56.30 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. शिरुर लोकसभा मतदारसंघातील पिंपरी-चिंचवड शहरात येणाऱ्या भोसरी विधानसभा मतदारसंघात 58.4 टक्के मतदान झाले. मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघात अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि चुरशीच्या लढतीत उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.

सकाळी सात वाजता मतदान सुरू झाल्यानंतर नऊ वाजेपर्यंत मतदानाचे प्रमाण कमी होते. पहिल्या दोन तासांमध्ये मतदानासाठी पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या कमी होती. नऊ वाजेपर्यंत केवळ 54 हजार 939 महिलांनी तर, 97 हजार 567 पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी नऊ वाजेपर्यंत 6.15 टक्के इतक्‍या मतदानाची नोंद झाली होती. नऊनंतर मात्र मतदान केंद्रांवर रांगा लागण्यास सुरुवात झाली होती. ही गर्दी दुपारी 12.30 वाजेपर्यंत कायम होती. या कालावधीत मतदानाची टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढली. दुपारी एक वाजेपर्यंत 31.85 टक्के इतकी मतदानाची नोंद झाली होती. दुपारपर्यंत चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक 30.69 टक्के मतदानाची नोंद झाली होती. त्यापाठोपाठ, पनवेल-30.37, कर्जत-29.57, उरण-24.5, मावळ-28.14, पिंपरी-27.63 टक्के मतदानाची नोंद झाली होती. दुपारनंतर उन्हाची काहिली वाढल्याने विविध मतदान केंद्रावरील मतदारांची गर्दी कमी झाली. दुपारी चारनंतर मतदानासाठी पुन्हा मतदार घराबाहेर पडले. सायंकाळी सहापर्यंत अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.

उष्णतेचा मतदानावर परिणाम
वेधशाळेच्या आकड्यांनुसार सोमवारी पारा 43 अंश सेल्सियसपर्यंत पोहचला होता. गेल्या एक आठवड्यापासून तापमान सातत्याने 40 अंशांच्या वर जात असल्याने मतदानाचा दिवस हा उष्णता आणि उकाड्याचा असणार याची पूर्वकल्पना मतदारांना होती. यामुळे उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी सकाळची वेळ साधत नऊपासूनच गर्दी करण्यास सुरवात केली होती. दुपारी एक ते तीनच्या दरम्यान उन्हाचा तडाखा वाढल्याने काही प्रमाणात मतदानाची गती मंदावली होती.

ईव्हीएम मशीन बंद पडण्याच्या घटना
मावळ मतदार संघातील काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन बंद पडण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे काही काळ मतदानाची प्रक्रिया ठप्प झाली होती. मात्र, माहिती मिळताच प्रशासनातर्फे संबंधित मशीन तातडीने बदलून देण्यात आल्या.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)