कच्च्या साखरेच्या निर्मितीसाठी अनुदान द्या – अशोक पवार

घोडगंगा साखर कारखान्याची 27वी वार्षिक सभा
शासनाच्या चुकीच्या निर्णयाने कारखाना आर्थिक अडचणीत
साखरेच्या उतरलेल्या दरामुळे एफआरपी देणे अवघड

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

न्हावरे, (योगेश मारणे)-
कच्च्या साखरेच्या निर्मितीसाठी शासनाने कारखान्यांना अनुदान द्यावे. साखरेच्या उतरलेल्या दरामुळे एफआरपी देणे शक्य नाही. उलट सरकारने बाहेरून साखर आयात करण्यापेक्षा आपल्या देशातील साखर निर्यात करणे गरजेचे आहे, असे मत न्हावरे (ता. शिरुर) येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार अ‍ॅड. अशोक पवार यांनी व्यक्त केले. दरम्यान आमदार बाबूराव पाचर्णे व त्यांच्या काही समर्थक सभासदांनी मध्येच सभात्याग केल्याने याचा निषेध करीत उपस्थित सभासद व माजी पदाधिकार्‍यांनी उघड नाराजी व्यक्त केली.

आमदारांचा सभात्याग, सभासदांकडून निषेध
सभा सुरू असताना अ‍ॅड. सुरेश पलांडे हे प्रश्नोत्तराच्या वेळी प्रश्न विचारत असताना, काही सभासदांनी अ‍ॅड. पलांडे हे कारखान्याच्या विरोधात कोर्ट कचेर्‍या लढवतात. त्यांना कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत सहभागी होण्याचा व प्रश्नोत्तराच्या कामात सहभाग घेण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे त्यांनी प्रश्नोत्तरातून बाहेर पडावे. अशी मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. यावर उलट अ‍ॅड. सुरेश पलांडे यांनी सभासदांना तुम्ही कोण? असे विचारत सभासदांशी हुज्जत घातली. त्यामुळे चिडलेल्या सभासदांनी अ‍ॅड. पलांडे यांना बोलण्यास मज्जाव केला. त्यावर आमदार पाचर्णे व काही समर्थक सभासदांनी सभा सुरु असताना सभात्याग केला. त्यामुळे उपस्थित सभासदांच्या वतीने कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब फराटे यांनी सभास्थळी जाहीर निषेध व्यक्त केला. त्यानंतर पुन्हा तासभर सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

न्हावरे (ता. शिरुर) येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची 27वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर आज (दि. 25) पार पडली. यावेळी अ‍ॅड. पवार सभासदांना मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी आमदार बाबूराव पाचर्णे, माजी आमदार पोपटराव गावडे, पंचायत समिती सभापती विश्वास कोहकडे, जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दादा पाटील फराटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवी काळे आदी मान्यवरांसह कारखान्याचे संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काही समर्थक सभासदांनी सभा सुरु असताना सभात्याग केला, तो त्यांचा प्रश्‍न आहे. सभेत सर्वांना बोलण्याचा, मते व्यक्त करण्याचा अधिकार आहे; मात्र सभेतून बाहेर पडणे हे आमदार बाबूराव पाचर्णे यांना शोभनीय नाही.
-अ‍ॅड. अशोक पवार, अध्यक्ष घोडगंगा साखर कारखाना

कारखान्याच्या प्रगतीची माहिती देताना अशोक पवार म्हणाले, कारखान्याने आगामी काळात इथेनॉल निर्मितीवर भर देणे गरजेचे आहे. तसेच यापुढेही कारखान्याच्या व सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले जातील. शासनाच्या चुकीच्या निर्णयाने कारखाना आर्थिक अडचणीत असताना सभासदांनी कारखाना व्यवस्थापनाला चांगले सहकार्य केले आहे. त्याबद्दल माजी आमदार अशोक पवार यांनी सभासदांचे जाहीर आभार मानले.

सभेच्या सुरुवातीला स्थानिक व देश पातळीवरील दिवंगत मान्यरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच कार्यक्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्‍या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. विषय पत्रिकेचे वाचन कारखान्याचे कार्यकारी संचालक संभाजी पाटील यांनी केले. तर प्रश्नोत्तराच्या वेळी आमदार बाबूराव पाचर्णे, शेतकरी संघटनेचे बाळासाहेब घाटगे, काकासाहेब खळदकर, अ‍ॅड. सुरेश पलांडे, सागर राजेनिंबाळकर, कुंडलिक शितोळे, संपत ढमढेरे, सर्जेराव मचाले आदी मान्यवरांनी सहभाग घेतला. यावेळी उपस्थितांचे स्वागत कारखान्याचे उपाध्यक्ष प्रा. सुभाष कळसकर यांनी केले. तर संचालक राजेंद्र गावडे यांनी आभार मानले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)