कचरा डेपोमुळे आरोग्य धोक्‍यात, विहिरींमध्ये काळे पाणी

  • बिरदवडी, वाघजाईनगर परिसर डम्पिंग एरिया आहे काय? ः नागरिकांचा सवाल

वाकी -चाकणसह राजगुरूनगर या दोन प्रमुख नगरपरिषदेबरोबरच या परिसरातील अनेक गावांतील कचरा मग तो हॉटेल्स, विविध समारंभातील कचरा, मंगल कार्यालयातील जेवणावळीच्या पत्रावळ्या, कारखान्यात जेवण पुरवठा करण्यात येणाऱ्या कॅंटीनचा कचरा त्याचबरोबर काही कारखान्यातील कचरा गाड्याच्या गाड्या भरून आंबेठाण रस्त्यावरील खराबवाडीच्या वाघजाईनगर व बिरदवडी (ता. खेड) या गावच्या हद्दीतील दगड खाणीत आणि तेथील मोकळ्या परिसरात बिनदिक्कतपणे टाकला जात आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. या कचऱ्यामुळे या भागात बकालपणा वाढला असून, तेथील विहिरींचे पाणी काळे पडले आहे. येथील कचरा त्वरित हटविण्यात यावा, अशी जोरदार मागणी येथील नागरिकांकडून होऊ लागली आहे.
चाकण – आंबेठाण रस्त्यावरील बिरदवडी व वाघजाईनगर हद्दीतील दगड खाणीमध्ये व त्याजवळील मोकळ्या जागेत नको त्या पद्धतीने कचऱ्याच्या गाड्या खाली केल्या जात आहेत. जास्त प्रमाणात कचरा साठल्यावर तो पेटविला जात आहे. या आगीत सगळा कचरा जळत नाही. त्यामुळे न जळालेला कचरा जागेवरच कुजत असल्याने खाणीतील पाणी बिरदवडी परिसरातील विहीरीत, बोअरवेलमध्ये जलस्रोताद्वारे येते. त्यामुळे हे पाणी पिण्यासाठी योग्य नसल्याने वाघजाईनगर, बिरदवडी व औद्योगिक वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य अक्षरशः धोक्‍यात आले आहे. हेच पाणी मुक्‍या जनावरांना पाजले तर त्यांच्याही जीवितास धोका पोहोचू शकतो. अशा अनेक घटना येथे रोजच घडत आहेत. असे असतानाही कचऱ्याची विल्हेवाट वेळेत का लावली जात नाही, असा प्रश्न उपस्थित राहत आहे. त्याकरिता नगरपरिषदेने स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी पर्यावरण संतुलन कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
चाकण व राजगुरूनगरसह काही गावांचा कचरा व्यवस्थापनाचा मार्ग खूप गंभीर होत चालला आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कुठलीही सक्षम यंत्रणा कार्यान्वित नसल्याने संपूर्ण शहरात पहाल तिथे कचरा अशी स्थिती निर्माण झाली आहे. औद्योगिक वसाहतीत कचऱ्याच्या साम्राज्यामुळे बकालपणा वाढला आहे. यातील कित्येक कचरा वरील गावातील दगड खाणीत टाकला जात असल्याने येथील गावच्या नागरिकांनी हा कचरा टाकण्याचा बंद करण्यात यावा, अशी मागणी केली होती. या कचऱ्यापासुन इतरांना त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाळ्यात हा कचरा पेटवला जातो; परंतु सगळा कचरा जळत नाही. त्यामुळे न जळालेला कचरा पावसाळ्यात कुजल्याने परिसरातील कुजलेल्या कचऱ्याच्या दुर्गंधीने या भागातील लोकांच्या घशाखाली घासही उतरत नाही. तसेच येथील विहिरींना पाणीही पिण्या व शेतीयोग्य राहिलेले नाही.

  •  डेपोविरोधात ग्रामस्थांची जोरदार मोहीम
    यापूर्वी चाकण शहराचाच कचरा येथील दगड खाणीत टाकला जायचा; परंतु अलिकडील काही वर्षांत चाकणसह राजगुरूनगर व इतरही कित्येक गावांचा कचरा येथे टाकला जात आहे. कचरा मोठ्या प्रमाणात दगड खाणीत टाकला जाऊ लागल्यामुळे जागा अपुरी पडू लागली. त्यामुळे खाणी लगतच्या मोकळ्या जागेवर कचरा अस्ताव्यस्त टाकला जात आहे. कचऱ्याच्या त्रासाने परिसरातील लोकांना डोळे, घसा, नाक व कान तसेच त्वचेचे, श्वसनाचे आजार होत आहे. त्यासाठी वाघजाईनगर व बिरदवडी गावांच्या ग्रामस्थांनी त्याचबरोबर ज्या उद्योजकांनी येथील परिसरात जमिनी घेतल्या आहेत. त्यांनी हा अघोषित डम्पींग ग्राउंड हलविण्याकरिता व कचरा या भागात टाकू नये, यासाठी जोरदार मोहिम उघडली आहे. हा कचरा डेपो ताबडतोब येथून हलवावा, अशी मागणी बिरदवडी व वाघजाईनगर भागातील ग्रामस्थांनी केली आहे.

पॉलिथिन बॅगची चाकणसह राजगुरूनगर शहरात खूप मोठ्या प्रमाणात सर्रासपणे विक्री आणि वापर केला जात आहे. यामध्ये छोटे दुकानदार, हॉटेलवाले, भाजीपाला विक्रिते, आदि पॉलिथिन बॅगचा अखंडपणे वापर करताना आढळत आहेत. या बॅग वापरून झाल्यावर कचऱ्यात फेकून दिल्या जात आहे. त्यामुळे प्रदुषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. या बॅगा कचऱ्यात टाकल्याने चाऱ्याबरोबर जनावरे पिशव्याही खात आहेत. नालेदेखील तुंबले आहेत. या बॅगांचे विघटन होत नसल्याने प्रदूषणाचा प्रश्न भीषण झाला आहे.
-बाळासाहेब उर्फ ज्ञानेश्वर शिळवणे, माजी सरपंच खराबवाडी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)