कंपन्यांचा आडमुठेपणा ग्राहक संभ्रमात (भाग-२)

कंपन्यांचा आडमुठेपणा ग्राहक संभ्रमात (भाग-१)

मुळात ट्रायने हा निर्णय घेतला तो केबल आणि सर्व्हिस प्रोवायडर कंपन्यांनी पारदर्शीपणा आणि जबाबदारपणा दाखवावा म्हणून. ट्रायने मार्च 17मध्ये एक नवे धोरण जाहीर केले होते. त्यानुसार पूर्वीची अॅनालॉग सिस्टीम बदलून सक्तीची स्वीचओव्हर सिस्टीम आणली होती. यामागे पारदर्शीपणा यावा आणि ग्राहकांना त्यांच्या खऱ्या पसंतीची चॅनेल्स पहायला मिळावीत अशी अपेक्षा होती. पण हे उद्दीष्ट काही सफल झाले नाही. म्हणूनच ट्रायने या केबल आणि डीटूएच यंत्रणेचेच व्यापक परिक्षण केले. आपल्या नव्या आदेशामुळे व्यवसायाभिमुख वातावरण तयार होईल, असे ट्रायचे म्हणणे आहे. पण ऑपरेटर आणि सर्व्हिस प्रोवायडर कंपन्यांना ते पटलेले दिसत नाही. स्टार इंडियाच्या विजय टीव्हीने तर ट्रायला टेरिफ ठरवण्याचा अधिकारच नाही अशी भूमिका घेत सरळ मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली. पण न्यायालयाने ट्रायच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात याविरोधात दाद मागण्यात आली. 30 ऑक्‍टोबर 18 रोजी सर्वोच्च न्यायालयानेही ट्रायच्या बाजूनेच निकाल दिला आणि त्यानंतर ट्रायने नवी टेरिफ प्रणाली अंमलात आणण्याचा निर्णय घेतला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ट्रायच्या नव्या टेरिफ आदेशानुसार ग्राहकांना त्यांच्या आवडीची चॅनेल्स निवडण्याची आणि फक्त निवडलेल्या चॅनेल्सचेच पैसे देण्याची मुभा आहे. 17 मध्येही ट्रायने अशाच प्रकारची प्रणाली रूढ करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यात यश आले नव्हते. केबल आणि डीटीएच प्रोव्हायडर्स काही चॅनेल्सचा गट करून त्यांचे पॅकेज तयार करतात आणि ते ग्राहकांच्या माथी मारतात. आता नव्या आदेशात या मंडळींना असे करता येणार नाही. कारण आता केबल आणि डीटीएचवाल्यांना ग्राहकांसाठी एकेक चॅनेल उपलब्ध करावे लागणार आहे आणि त्यासाठी जास्तीत जास्त रिटेल किंमत आकारावी लागणार आहे आणि त्यांना हे करायचे नाहीये. त्यांचे म्हणणे आहे असे केल्याने काही चॅनेल्सना मागणीच राहणार नाही. लोकप्रिय नसलेली चॅनेल्स किंवा दीर्घकालीन व्ह्यूअरशीप कमी होईल, अशी भीती त्यांना वाटते. आणि त्यामुळे त्यांचा महसूल घटेल असेही त्यांना वाटते.

ट्रायची नवी प्रणाली लागू झाली तर आपण कोणती टीव्ही चॅनेल्स पहायची आणि कोणती नाही हे ठरवण्याचा अधिकार ग्राहकांना मिळेल, नव्हे ते तोच ठरवू शकतो. नव्या प्रणालीत त्याला एकेक चॅनेल निवडण्याची पूर्ण मुभा असणार आहे आणि या प्रत्येक चॅनेलचे दर टीव्ही स्क्रीनवर असणे आवश्‍यक आहे. केबल आणि डीटीएचवाले चॅनेल्सचे बुके म्हणजे गटही तयार करू शकतात. पण या गटांची किंमत त्यांनी प्रकाशित करावी लागणार आहे. ट्रायने आता याबाबत कडक भूमिका घेत 1 फेब्रुवारीपासून नवी व्यवस्था आणायचाच निर्धार केला आहे. 153 रुपयांत मिळणाऱ्या 100 चॅनेल्समध्ये प्रसारभारतीची 24 सक्तीची चॅनेल्स असणार आहेत. याशिवाय उर्वरीत चॅनेल्समध्ये ग्राहक मोफत किंवा सशुल्क चॅनेल्सचा समावेश या 100 चॅनेल्समध्ये करू शकतो. मोफत चॅनेल्सचे पैसे ग्राहकाला द्यावे लागणार नाहीत. पण सशुल्क चॅनेल्सबाबत मात्र केवळ त्याच चॅनेल्स/बुकेचे पैसे ग्राहकाला द्यावे लागतील. ग्राहकाला जर 100 पेक्षा अधिक चॅनेल्स हवी असतील तर त्याला अतिरीक्त क्षमता फी भरावी लागेल, ती दर 25 चॅनेल्सना 20 रुपये इतकी असणार आहे. एकूणच ट्रायचा हा निर्णय ग्राहकांच्या हिताचा आहे. केबल आणि डीटीएच कंपन्या शेवटी ग्राहकांच्या आश्रयावरच चालणार आहेत. ग्राहकराजाला नाराज करून या कंपन्यांच्या हाती काहीच लागणार नाही. ट्रायच्या आदेशाची अंमलबजावणी करणे हेच या कंपन्यांच्याही हिताचे आहे.

– सूर्यकांत पाठक, कार्याध्यक्ष, अ.भा.ग्राहक पंचायत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)