औषध व सेवा 

डॉ. न. म. जोशी 

नागार्जुन नावाचे एक प्रख्यात वैद्य प्राचीनकाळी होऊन गेले. नागार्जुन एका राजाचा दरबारी राजवैद्य होते. राजाने त्यांना औषधनिर्माणासाठी एक प्रयोगशाळाही सिद्ध करून दिली होती. नागार्जुन यांना आपल्या प्रयोगशाळेत एक सहाय्यक हवा होता. त्यांनी राजाला याबाबत विचारलं. राजानं दोन तरुण सहाय्यकांना त्याच्याकडं पाठवलं आणि सांगितलं,
“”या दोन तरुणांपैकी तुम्हाला जो सहाय्यक हवा तो निवडा.”
दोघेही औषधनिर्माणशास्त्रात हुशार होते. मग दोघांपैकी एकाची निवड कशी करायची हा प्रश्‍न होता.
नागार्जुनाने दोघांचीही परीक्षा घेण्याचं ठरवलं. नागार्जुनाने दोघांनाही एक एक कमंडलू भरून रसायन द्रव दिलं आणि सांगितलं,

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“”दोघही राजरस्त्यानं जा, आपापल्या घरी जा आणि चार तासांनी यातून एक औषधीद्रव्य तयार करून आणा.”
दोघेही आपापले कमंडलू घेऊन त्याच रस्त्याने चालले होते, दोघांनीही रस्त्यात एक वृद्ध स्त्री विव्हळ होऊन पडलेली पाहिली…
चार तासांत परत येऊन नागार्जुनाकडं औषधीद्रव्य द्यायचं होतं. दोघेही परत आले. एकानं औषधीद्रव तयार केलं होतं. दुसरा मात्र तसाच परत आला. त्यानं सांगितल्याप्रमाणे काम केलं नव्हतं.
ज्यानं औषधीद्रव तयार केलं होतं तो परीक्षेत उत्तीर्ण झाला. त्यानं केलेलं औषधीद्रव उत्तम होतं.
पण नागार्जुनानं निवड केली ती दुसऱ्या तरुणाची. त्यानं तर औषधीद्रव तयार केलं नव्हतं. राजाला आश्‍चर्य वाटलं. त्यानं नागार्जुनाला विचारलं, “”ज्यानं औषधी द्रव तयार करून परीक्षा उत्तीर्ण झाला त्याची निवड न करता ज्यानं काहीच काम केलं नाही त्याची निवड तुम्ही केली?”
नागार्जुनानं सांगितलं, “महाराज, दोघांचीही मी परीक्षा घेतली. पहिला कर्मकांडात उत्तीर्ण झाला. पण दुसरा… दोघांनीही रस्त्यात विव्हळ म्हातारी पाहिली होती. दुसऱ्या तरुणानं औषधनिर्माणाऐवजी तिची सेवा करून तिच्यावर उपचार केले. तिच्या जखमा धुतल्या. त्यामुळे त्याला औषधनिर्मात्याला वेळ मिळाला नाही. या तरुणाची मी निवड केली. याचं कारण असं की रुग्णोपचारामध्ये औषधापेक्षा जास्त उपयोग होतो तो रुग्णसेवेचा. रुग्णोपचारात औषधांच्या बरोबरीने रुग्णसेवा महत्त्वाची. सेवेचं महत्त्व ज्याला समजलं त्याची निवड मी केली.”

कथाबोध 
औषधे ही रुग्णाला बरे करण्यासाठी उपकारक असतातच पण रुग्णाला सेवेचं अमृत हवं असतं सेवा हीच संजीवनी असते. असं सांगतात की डॉक्‍टर किंवा वैद्य यांच्या नुसत्या सहानुभूतीच्या बोलण्यानं आजार निम्मा बरा होतो. उरलेलं काम औषधं करतात. नागार्जुनानं निवड केलेला तरुण मानवधर्माचा उपासक होता आणि पहिला तरुण कार्यकुशल असला तरी त्याच्याजवळ सेवेचा समजूतदारपणा नव्हता. औषधापेक्षा सेवा महत्त्वाची!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)